तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिनेश कार्तिकला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सूर गवसला. त्याने शुक्रवारी (दि. १७ जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. तसेच, आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्यामुळे संघाला १६९ धावांचा पल्ला गाठता आला. या सामन्यात त्याने केलेल्या फटकेबाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यानंतर कार्तिकला मुरली कार्तिक याने एक प्रश्न विचारला, ज्याचे त्याने मजेशीर उत्तर दिले.
मुरली कार्तिक (Murali Karthik) याने दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला प्रश्न विचारला की, “तू २००६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा भाग होता. आता १६ वर्षांनंतरही तू संघासोबत आहेस. तू जवळपास ३ वर्षांनंतर भारतीय संघात परतला आहेस. तुला कसं वाटत आहे?”
या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक मजेशीर अंदाजात म्हणाला की, असं वाटतंय की खूप वय झाले आहे. दिनेश कार्तिक हसत हसत म्हणाला की, “जेव्हाही मला हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा मला वाटते की, मी खूप म्हातारा झालो आहे. मी वेगवेगळ्या पिढ्यांसोबत क्रिकेट खेळलो आहे. पहिल्या सामन्यात जे २२ खेळाडू खेळले होते, त्यातील २१ निवृत्त झाले आहेत.”
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला ८२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळाले असता, भारताने ६ विकेट्सच्या नुकसानीवर १६९ धावा चोपल्या. कार्तिकला हार्दिक पंड्याची साथ मिळाली. त्यांनी ६५ धावांची भागीदारी रचली. पंड्याने ३१ चेंडूत ४६ धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ १६.५ षटकात ८७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून आवेश खानने चार विकेट्स घेतल्या. यापैकी ३ विकेट्स त्याने एकाच षटकात घेतले.
या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. यापूर्वी खेळलेल्या सुरुवातीच्या पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. यानंतर विशाखापट्टणम येथे भारताने विजयाचं खातं उघडलं. अशात आता मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक टी२० सामना रविवारी (दि. १९ जून) बंगळुरू येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आवेश खानने वडिलांना समर्पित केल्या आपल्या ४ विकेट्स, कारण जाणून तुम्हीही ठोकाल सलाम!