भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी तसेच टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे सामन्यात आणि टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व उपकर्णधार रोहित शर्मा करेल.
रोहितने आत्तापर्यंत भारताचे 8 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. यातील सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 7 सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे.
रोहितने नुकतेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या एशिया कप स्पर्धेतही भारताचे नेतृत्व करताना विजेतेपदाला गवसणी घातली होती. तसेच त्याने त्याआधी डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. विशेष म्हणजे या मालिकेत त्याने वनडेतील त्याचे तिसरे द्विशतकही केले होते.
त्याचबरोबर रोहितने आत्तापर्यंत 12 टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी 11 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात भारताने पराभव स्विकारला आहे.
त्याने 2017 मध्ये श्रीलंके विरुद्धच पहिल्यांदाच भारतीय टी20 संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका टी20 सामन्यात तसेच श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये आणि विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत भारताचे कर्णधारपद सांभाळले आहे.
कोहलीला विश्रांती देण्याबाबत बीसीसीआयने म्हटले आहे की ‘त्याचा मागील काही महिन्यांचा ताण लक्षात घेता संघ व्यवस्थापन आणि वरिष्ठ निवड समीतीने त्याला मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेआधी पुरेशी विश्रांती देण्याचा विचार केला आहे.’
‘या न्यूझीलंड दौऱ्यात कोहलीचा बदली खेळाडू म्हणून कोणत्याही खेळाडूची निवड केली जाणार नाही. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व जबाबदारी स्विकारेल.’
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध फेब्रुवारीमध्ये 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत हा प्रतिभावान खेळाडू १०० टक्के करणार पदार्पण
–केवळ ३६ वनडे खेळलेल्या कुलदीप यादवने जगाला या गोष्टीमुळे दखल घ्यायला लावली
–ज्या देशात पाऊल ठेवतो त्या देशात हा भारतीय खेळाडू नादबाद खेळी करतो