देशात रणजी क्रिकेटची धूम सुरू आहे. सध्या मिझोरम आणि मणिपूर यांच्यात सामना खेळला जातोय. या सामन्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नि चोप्रा यानं सलग दुसरं द्विशतक झळकावून धमाका केला.
रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरमकडून खेळणाऱ्या अग्नि चोप्रानं यापूर्वी अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यातही द्विशतक झळकावलं होतं. त्यानं त्या सामन्यात नाबाद 238 धावांची खेळी केली होती. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात अग्निनं पहिल्या डावात 110 धावा केल्या होत्या. आता त्यानं मणिपूरविरुद्धच्या सामन्यात 269 चेंडूत 218 धावांची खेळी खेळली. आपल्या या खेळीत अग्निनं 29 चौकार आणि एक षटकार मारला.
अग्नि चोप्रानं आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9 सामने खेळले असून त्याच्या 17 डावात त्यानं 1567 धावा ठोकल्या आहेत. सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अग्निची सरासरी 100 धावांपेक्षा जास्त आहे. तो सध्या 104.47 च्या सरासरीनं धावा ठोकतो आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 95.78 आहे. अग्निनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 8 शतकं आणि 4 अर्धशतकं ठोकली. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी 99.01 एवढी आहे, हे विशेष.
25 वर्षीय अग्नि चोप्रा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सतत धावा करत आहे. रणजी ट्रॉफी 2024-25 च्या हंगामात त्यानं आपल्या फलंदाजीनं दाखवून दिलं की त्याच्यात किती क्षमता आहे. तो सध्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या कामगिरीच्या जोरावर त्यानं टीम इंडियाचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली आहे. आता अग्निला भारतीय संघात कधी संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
काय सांगता! 2024 मध्ये टीम इंडियानं एकही वनडे सामना जिंकला नाही, यापूर्वी फक्त एकदाच असं घडलं
काय करावं ते सुचेना! भारताच्या दिग्गज फलंदाजांनी चक्क ‘पार्ट टाईम क्रिकेटर’समोर गुडघे टेकले
लाजिरवाण्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडवर, वानखेडे कसोटीपूर्वी घेतला हा मोठा निर्णय!






