भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या देशांतर्गत स्पर्धेत सध्या विनू मांकड करंडक खेळवला जात आहे. सोमवारी (११ ऑक्टोबर) उत्तर प्रदेश आणि नागालँड यांच्यात झालेल्या सामन्यात यूपीचा खेळाडू वासु वत्सने मोठा पराक्रम केला. वेगवान गोलंदाज वासूने १९ वर्षांखालील या स्पर्धेत नागालँडविरुद्ध हॅट्रिक घेत तब्बल आठ गडी देखील बाद केले. त्याच्या वेगवान चेंडूंसमोर विरोधी संघाच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते. यामुळेच नागालँडचा संपूर्ण संघ केवळ २२ धावांवर बाद झाला.
या १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशच्या संघाने निर्धारित ५० षटकांत सहा गडी गमावून ३५८ धावा केल्या होत्या. ज्यात कर्णधार आराध्य यादवच्या १३१ धावांच्या खेळीचा समावेश होता. त्याच्याशिवाय सलामीवीर अर्णव बलियानने ७२ धावांचे योगदान दिले, तर स्वस्तिकने ४९ धावा केल्या. नागालँडकडून राजा स्वर्णकरने ३ विकेट्स घेतल्या, तर ओडिलेम्बा, नेजेखो आणि केदुवेटुओ हे प्रत्येकी एक गडी बाद करण्यास यशस्वी ठरले.
विजयासाठी ३५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नागालँड संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाचे फलंदाज यूपीच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले आणि याच कारणामुळे नागालँडचे नऊ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. या दरम्यान, दोन फलंदाज खाते उघडण्यात यशस्वी झाले पण त्यांनाही दुहेरी आकडा पार करता आला नाही.
सुजल प्रसादने संघासाठी सर्वाधिक सात धावा केल्या, तर तेजसिली सॅविनोच्या बॅटमधून दोन धावा आल्या. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज वासु वत्सने ८ बळी घेत एकहाती सामना जिंकवून दिला.
वासु वत्सने सामन्यात जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या सात षटकांच्या स्पेलमध्ये चार धावा देऊन आठ विकेट्स घेतल्या, त्यात त्याने तीन षटके निर्धाव टाकले. या दरम्यान, नागालँडच्या डावाच्या ११ व्या षटकात, त्याने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर हॅटट्रिक केली. सुजल प्रसाद, बामिबे नपनमय आणि ख्रेवित्सोला यांना त्याने एकापाठोपाठ एक माघारी चालते केले.
त्याचा सहगोलंदाज अभिषेक तोमरला दोन बळी मिळाले. नागालँडच्या एकूण २२ धावांच्या डावात त्यांना तब्बल १३ धावा अतिरिक्त मिळाल्या. अशाप्रकारे, उत्तर प्रदेशने हा सामना ३३६ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश; म्हणाला…
पराभवानंतर कर्णधार कोहली झाला भावुक, आरसीबीचा ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल