टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सोमवारी (८ नोव्हेंबर) भारताने त्यांच्या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळला. यावर्षी भारतीय संघाचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. भारताला स्पर्धेतील अंतिम चार संघांमध्येही स्थान बनवता आले नाही. भारतीय संघाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या शेवटच्या तीन सामन्यात चांगले प्रदर्शन केले आणि तीनही सामन्यात विजय मिळवला, पण तरीही संघाला या चार संघात संधी मिळाली नाही.
टी२० विश्वचषकात काही खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून सर्वाची मने जिंकली, पण काही खेळाडूंनी निराश केले. असे असले तरी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या टी-२० विश्वचषकात काही चुकीचे निर्णय घेतले, ज्यामुळे संघ उपांत्य सामन्यात पोहोचू शकला नाही. आपण या लेखात विराटने टी२० विश्वचषकात घेतलेले हेच तीन चुकीचे निर्णय पाहणार आहोत.
विराट कोहलीने घेतलेले हे तीन निर्णय भारतीय संघाला पडले महागात
१. फलंदाजांचा क्रम बदलला
भारतीय संघाला टी२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० विकेट्सने पराभव मिळाला. त्यानंतर स्पर्धेतील पुढच्या सामन्यात कर्णधार विराटने मोठा बदल केला, त्याने संघाच्या वरच्या फळीमध्ये बदल केला. विराटने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात असा बदल केला, ज्याची कोणीच कल्पना केली नसेल.
न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताची नियमित सलामीवीर जोडी पाहायला मिळाली नाही. या सामन्यात सलामीसाठी केएल राहुल आणि ईशान किशन हे दोघे आले होते. तर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावार फलंदाजीसाठी आला होता. विराटने स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. या सामन्यात भारतीय संघ अवघ्या ११० धावा करू शकला होता.
२. एकाही लेग स्पिनरला खेळवले नाही
यूएईत आयोजित टी२० विश्वचषकात लेग स्पिनर्सचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या शादाब खानने चार षटकात २२ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. तसेच दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या ईश सोढीने भारताविरुद्ध चार षटकात १७ धावा देऊन २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. सोढीला या सामन्यात सामनावीर निवडले गेले होते.
त्याव्यतिरिक्त टी२० विश्वचषकात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या एडम जम्पा इंग्लंडच्या आदील रशीद आणि श्रीलंकेच्या हसरंगा या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. असे असले तरी, भारतीय संघाने एकाही सामन्यात त्यांच्या लेग स्पिनरला संधी दिली नाही. राहुल चाहरला संपूर्ण टी२० विश्वचषकादरम्यान मैदानाबाहेर ठेवले गेले. तर मागच्या पाच वर्षात भारतासाठी सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज ठरलेल्या युजवेंद्र चहलला टी२० विश्वचषकासाठी संघातच निवडले नव्हते.
३. भारताकडे पर्यायी योजना नव्हती
टी२० विश्वचषकात प्रत्येक संघ जिंकण्यासाठी खेळतो, पण जर त्यांच्या संघावार पराभव पत्करण्याची वेळ आणि संघ अडचणीत आला, तर त्यांच्याकडे दुसरी योजना तयार असते. मात्र, टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाकडे अशाप्रकारची कसलीच पर्यायी योजना दिसली नाही. भारतीय संघाकडे पर्यायी खेळाडू नव्हते. स्पर्धेदरम्यान अष्टपैलू हार्दिक पंड्या अपेक्षित कामगिरी करू शकत नव्हता, अशात संघाकडे त्याला पर्याय ठरेल असा खेळाडू नव्हता.
हार्दिकला संघाबाहेर ठेवायचे झाल्यास, सामन्याचा शेवट कोणता खेळाडू करणार हा प्रश्न होता. अशात हार्दिकला पर्यायी खेळाडू नसल्यामुळे त्याला संघात कायम ठेवले गेले. त्याव्यतिरिक्त वरूण चक्रवर्तीला पहिल्या दोन सामन्यात संधी दिली होती. त्याला या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने यो दोन्ही सामन्यात एकही विकेट घेतली नाही, तरीही त्याला तिसऱ्या सामन्यातही संधी दिली गेली. अशात, राहुल चाहरला मात्र, एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चाहत्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत करू’, हार्दिक पंड्याने दिले आश्वासन
विराट कोहलीने प्रशिक्षक रवी शास्त्रींना मिठी मारत दिला भावपूर्ण निरोप, व्हिडिओ व्हायरल