लीड्स येथील प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी खेळली जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारतीय डावाला सुरुंग लागला. कर्णधार विराट कोहली देखील पुन्हा एकदा अपयशी ठरला. यासह विराटला ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
पुन्हा एकदा अँडरसनचा शिकार ठरला विराट
जेम्स अँडरसनने पहिल्या पाच षटकात केएल राहुल व चेतेश्वर पुजारा यांना माघारी धाडल्यानंतर कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. मात्र, १७ चेंडूंवर ७ धावा काढत तो अँडरसनच्याच गोलंदाजीवर यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. अँडरसनने त्याला चालू मालिकेतील तीन कसोटीच्या चार डावात दुसऱ्यांदा बाद केले. नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या डावात अँडरसनने विराटला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.
विराटचे विनाशतक ५० डाव
भारतीय कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जात असला तरी, मागील जवळपास दीड वर्षापासून तो शतक ठोकून शकला नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने आपले अखेरचे कसोटी शतक बांगलादेशविरुद्ध कोलकता कसोटीत ठोकले होते. तेव्हापासून विराट ५० आंतरराष्ट्रीय डाव खेळला आहे. यामध्ये तो एकदाही तिहेरी आकडा गाठू शकला नाही. विराटने या काळात १८ कसोटी डाव, १५ वनडे व १७ टी२० सामने खेळले आहेत.
कारकिर्दीत तिसऱ्यांदा आला बॅडपॅच
विराटचा कारकिर्दीत अशा प्रकारचा बॅडपॅच तिसऱ्यांदा आला आहे. यापूर्वी २०११ मध्ये तो २४ डावांमध्ये शतक झळकावू शकला नव्हता. त्यानंतर, २०१४ मध्ये देखील त्याला सलग २५ डावांमध्ये शतक झळकावण्यात अपयश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टॉस जिंकल्याने कर्णधार कोहली शॉक; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
कोरोना महामारीत खेळाडूंच्या कमाईत कपात, मात्र अधिकाऱ्यांना बोनस; ईसीबीच्या निर्णयाने खळबळ
दहा वर्षात अँडरसनचा टीम इंडियावर चौथा वार! वाचा ही खास आकडेवारी