2019 विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी भारतीय संघ बुधवारी(22 मे) इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
या विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पण असे असले तरी तो एकटा विश्वचषक जिंकू शकत नाही. त्याला त्यासाठी संघसहकाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने व्यक्त केले आहे.
सचिनला 1996, 1999 आणि 2003 मध्ये त्याच्यावर जसा दबाव होता तसाच यावेळी विराटवर असणार आहे का, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला वाटते तूमच्याकडे प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करणारे काही खेळाडू असतात. पण संघाच्या पाठिंब्याशिवाय ते जास्त काही करु शकत नाही. एका खेळाडूमुळे तूम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. महत्त्वाच्या वेळी अन्य खेळाडूंनाही त्यांची भूमिका निभवावी लागेल. जर हे झाले नाही तर ही निराशेची बाब असेल.’
त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीच्या जागेबद्दल सचिन म्हणाला, ‘ मला वाटते आपल्याकडे या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज आहेत. चौथा क्रमांक हा फक्त अकडा आहे. तो समायोजित केला जाऊ शकतो.’
‘मला वैयक्तिकरित्या चौथा क्रमांक ही समस्या वाटत नाही. आपले खेळाडू पुरेसे क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या भूमिका माहित आहेत. मग तो क्रमांक 4, 6 किंवा 8 असला तरी. त्यामुळे परिस्थितीची जाणीव असणे सर्वात महत्त्वाचे आहे.’
तसेच रिस्ट स्पिनर (मनगटाच्या सहाय्याने गोलंदाजी करणारे फिरकीपटू) या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका निभावतील असेही सचिनने म्हटले आहे. भारताकडे या विश्वचषकासाठी युजवेंद्र चहल आणि कुलदिप यादव या फिरकीपटूंचा पर्याय आहे. पण या दोघांचीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या वनडे मालिकेतील कामगिरी प्रभावी ठरली नव्हती.
याबद्दल बोलताना सचिन म्हणाला, ‘असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांना फलंदाज चांगले ओळखतात. पण तरीही त्यांना विकेट मिळते. कुलदीप आणि चहलला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेबद्दल जास्त त्रास करुन घेण्याची गरज नाही.’
सचिनने यासाठी मुथय्या मुरलीधरनचे उदाहरण देताना म्हटले की ‘मुरली ऑफ ब्रेक आणि दुसरा टाकायचा. त्याचे हे चेंडू फलंदाज चांगल्याप्रकारे समजायचे. पण तरीही त्याला विकेट मिळायची.
याबरोबरच वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल सचिनने चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की ‘दोन नवीन चेंडू आणि सपाट खेळपट्टीमुळे गोलंदाजांची आवस्था बिकट होते. एक संघ 350 धावा करत आहे तर दुसरा संघ 45 षटकातच या धावांचे लक्ष पूर्ण करत आहे.’ हे बोलताना सचिनचा इशारा नुकत्याच इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडलेल्या वनडे मालिकेकडे होता.
सचिन म्हणाला, ‘यावर विचार केला गेला पाहिजे. दोन नवीन चेंडू घेणार आहात तर गोलंदाजांना मदतशीर खेळपट्टी तरी बनवली गेली पाहिजे. नाहीतर पुन्हा एका चेंडूची जूनी व्यवस्था कायम केली पाहिजे. ज्यामुळे निदान गोलंदाजांनी रिवर्स स्विंग तरी मिळेल. गोलंदाजांसाठी काहीतरी केले पाहिजे.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.






