लंडन। भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी (६ सप्टेंबर) इंग्लंडविरुद्ध केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या कसोटी सामन्यात १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. त्याचबरोबर या विजयामुळे विराटच्या नावावर मोठे विक्रम नोंदवले गेले आहेत.
दिग्गजांमध्ये मिळवले स्थान
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मिळवलेला हा कसोटीतील ३८ वा विजय ठरला आहे. त्यामुळे विराट सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या जगातील एकूण कर्णधारांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला असून त्याने वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांना मागे टाकले आहे. लॉईड यांनी ३६ कसोटी विजय मिळवले आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ आहे. त्याने ५३ कसोटी विजय कर्णधार म्हणून मिळवले आहेत. त्याच्यापाठोपाठ ४८ विजयांसह रिकी पाँटिंग आणि ४१ विजयांसह स्टिव्ह वॉ आहेत.
तसेच मायदेशाबाहेर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत देखील विराटने पाचवा क्रमांक मिळवला आहे. त्याने भारताबाहेर कर्णधार म्हणून १५ कसोटी विजय मिळवला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर क्लाईव्ह लॉईड आहेत. त्यांनी मायदेशाबाहेर कर्णधार म्हणून २३ कसोटी विजय मिळवले आहेत. त्यांच्या पाठोपाठ ग्रॅमी स्मिथ (२२), रिकी पाँटिंग (१८) आणि स्टिव्ह वॉ (१६) हे कर्णधार आहेत.
पहिला आशियाई कर्णधार
या विजयासह विराट असा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे, ज्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात एकाच कसोटी मालिकेत २ किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताने विराटच्या नेतृत्वाखाली याआधी लॉर्ड्स कसोटीतही विजय मिळवला होता. तसेच विराटच्या नेतृत्त्वाखाली २०१८-१९ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने कसोटी मालिकेत २ सामने जिंकले होते.
विराटची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने २०१५ सालापासून भारताचे कसोटीत नियमितपणे नेतृत्त केले आहे. त्याने आत्तापर्यंत भारताचे ६५ कसोटी सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्याने ३८ कसोटीत विजय मिळवला असून १६ कसोटीत पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लॉर्ड शार्दुल’ इन ॲक्शन! जो रुटला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला दिला जोरदार दणका, पाहा व्हिडिओ
व्वा बेटे, मौज कर दी! एरवी सर्वांना ट्रोल करणारा जाफर, कॉट्रेलच्या ‘हिंदी’ उत्तराने झाला गार
बुमराह ऑन फायर!! ऑली पोपला बोल्ड करत घडवला मोठा इतिहास; कपिल देव, शमी सारखे गोलंदाज पडले मागे