भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही स्वरुपात सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. तसेच त्याने गेल्या काही वर्षात कर्णधार म्हणूनही आपली वेगळीच छाप सोडली आहे. विराट कोहलीसमोर आगामी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यासह त्याला या दौऱ्यावर दिग्गज फलंदाजांना मागे टाकत मोठा किर्तिमान करण्याची संधी असणार आहे.
येत्या ४ ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यावर त्याला दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आणि रिकी पाँटिंग यांचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. तसेच तो या दौऱ्यावर सर्वाधिक शतक झळकावणारा कर्णधार ठरू शकतो. इतकेच नव्हे तर, त्याने धावांचा पाऊस पाडला तर आणखी ४ नवे विक्रम तो आपल्या नावावर करू शकतो.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके झळकावली आहेत. त्याने ९२ कसोटी सामन्यांमध्ये २७ आणि २५४ वनडे सामन्यात ४३ शतक झळकावले आहेत. तसेच एक कर्णधार म्हणून त्याने ४१ शतक झळकावले आहेत. तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे पहिल्या स्थानी विराजमान आहे. जर त्याने या दौऱ्यावर एक शतक झळकावले; तर तो रिकी पाँटिंगला मागे टाकत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावणारा खेळाडू ठरू शकतो.(Virat Kohli can become surpass Ricky ponting and Don bradmon on this tour)
तसेच त्याने या दौऱ्यावर ३ शतक झळकावले; तर तो दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम तोडू शकतो. त्यांनी कसोटी कारकिर्दीत एकूण २९ शतके केली होती. तसेच डॉन ब्रॅडमन यांनी ५२ कसोटी सामन्यात ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या होत्या. या दरम्यान ३३४ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती.
कसोटीत आठ हजार पेक्षा अधिक धावा
विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत एकूण ५२.०४ च्या सरासरीने ७५४७ धावा केल्या आहेत. या दरम्यान २५४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. जर त्याने या मालिकेत ४५३ धावा केल्या; तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या ८००० धावा पूर्ण होतील. असा कारनामा करणारा तो ३३ वा फलंदाज ठरेल.
इंग्लंड संघाविरुद्ध २००० धावा करण्याची संधी
विराट कोहलीने इंग्लंड संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण २३ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यातील ४१ डावात त्याने १७४२ धावा केल्या आहेत. जर तो या मालिकेत २६८ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्यास यशस्वी ठरला; तर तो इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करेल. असा कारनामा करणारा तो ३५ वा फलंदाज ठरेल. इंग्लंड संघाविरुद्ध सार्वधिक धावा करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी ३७ कसोटी सामन्यात ५०२८ धावा केल्या होत्या.
मोडेल सचिन-द्रविडचा विक्रम
विराट कोहलीने जर या मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावले; तर तो सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मोडू शकतो. विराट कोहलीने इंग्लंड संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण ५ शतक झळकावले आहेत. तर सचिन तेंडुलकर आणि राहूल द्रविड यांनी आपल्या कारकीर्दीत इंग्लंड संघाविरुद्ध प्रत्येकी ७-७ शतके मारली आहेत.
बनू शकतो सर्वात जलद २३ हजार धावा करणारा फलंदाज
विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ४३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यातील ४८४ डावात त्याने २२८७५ धावा केल्या आहेत. जर त्याला पुढील ३ डावात १२५ धावा करण्यात यश आले; तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३ हजार धावा पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज ठरेल.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दूसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा ‘हा’ शिलेदार द्रविडसारखा खेळला तर इंग्लंडचा पराभव निश्चित; माजी क्रिकेटरचा छातीठोक दावा
आयपीएल फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ, ‘या’ देशातील खेळाडू पहिल्या आठवड्यात नसणार उपलब्ध
बीसीसीआयच्या सीईओ पदासाठी शोधमोहीम सुरू, आयपीएल मुख्य कार्यकारी अमीनही करू शकतात अर्ज