इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी इंग्लंड संघाने अप्रतिम फलंदाजी करत ३५४ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सामन्याच्या चौथ्या दिवशी (२८ ऑगस्ट) भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे चार मोठे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
हा मोठा विक्रम होऊ शकतो विराटच्या नावावर
इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाला २ बाद २१५ धावा करण्यात यश आले आहे. यादरम्यान चेतेश्वर पुजारा नाबाद ९१ तर विराट कोहली नाबाद ४५ धावा करून मैदानावर टिकून आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी (२८ ऑगस्ट) विराट आणखी ११ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले २३,००० धावा पूर्ण करणार आहे. सचिन आणि राहुल द्रविड नंतर असा कारनामा करणारा तो तिसराच फलंदाज ठरेल. सचिनने ६६४ सामन्यात ३४,३५७ धावा केल्या आहेत. तर राहुल द्रविडने ५०९ सामन्यात २४,८०२ धावा केल्या आहेत.
कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावण्यापासून ५५ धावा दूर
विराट लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ४५ धावांवर नाबाद परतला आहे. त्यामुळे कसोटीतील चौथ्या दिवशी त्याला शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या ५५ धावांची आवश्यकता आहे. गेल्या ५० डावात त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. शतक झळकावताच तो माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी करणार आहे. रिकी पाँटिंगने देखील आपल्या कारकीर्दीत ७१ शतक झळकावले आहेत. विराटच्या नावावर सध्या ७० शतके आहेत.
परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा
लीड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याला ६९ धावा करता आल्या, तर तो परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करणार आहे. त्याने आतापर्यंत परदेशात कसोटी क्रिकेट खेळताना ३९३१ धावा केल्या आहेत. या डावात त्याला ४००० धावा करण्याची सुवर्णसंधी आहे.(Virat Kohli can break this four big records)
इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा
विराट कोहलीने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण १४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८९८ धावा केल्या आहेत. जर त्याला या डावात १०२ धावा करता आल्या, तर तो इंग्लंड संघाविरुद्ध इंग्लंडमध्ये १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या विराट ब्रिगेडविरुद्ध ‘या’ योजनेसह उतरलाय इंग्लंड संघ
हेडिंग्ले कसोटी जिंकण्याची भारताला अजूनही संधी, ‘ही’ आकडेवारी देतेय टीम इंडियाला दिलासा
झिम्बाब्वेची विजयी सुरुवात, पहिल्या टी२०त आयर्लंडवर ३ धावांनी दणदणीत विजय