पुढील महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकांसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे.
पण या मलिकांपैकी टी20 मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली विश्रांती घेण्याची शक्यता आहे. विराट मागील काही महिन्यांपासून सातत्याने खेळत आहे. त्यामुळे त्याला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.
याबद्दल काही दिवसांपूर्वी एका सुत्राने पीटीआयला माहिती दिली होती की ‘विराटच्या कामाचे व्यवस्थापन लक्षात ठेऊन त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर निवड समीती त्याच्याशी चर्चा करेल.’
‘विराटला काय वाटते यावरही हे अवलंबून आहे. त्यालाच त्याच्या शरिराबद्दल माहिती आहे. जर त्याला गरज असेल तर तो स्वत: निवड समीतीकडे विश्रांती मागू शकतो.’
विराट जरी टी20 मालिकेसाठी विश्रांती घेण्याची शक्यता असली तरी तो कसोटी मालिकेत मात्र खेळणार असल्याचे जवळजवळ पक्के आहे.
बांगलादेश विरुद्ध 3 नोव्हेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे आणि कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल.





