टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली सध्या कुटुंबासह सुट्टीवर आहे. तो 2 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसेल. या मालिकेदरम्यान विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावे करू शकतो. त्याच्यापूर्वी अशी कामगिरी केवळ दोन फलंदाजांनी केली आहे.
विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. कोहलीनं आतापर्यंत 292 सामन्यांच्या 280 डावांमध्ये 13,848 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट 152 धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो या फॉरमॅटमध्ये 14 हजार धावांचा आकडा गाठणारा जगातील फक्त तिसरा फलंदाज ठरेल.
जगात असे केवळ दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ही कामगिरी करणारा पहिला खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱा फलंदाज आहे. त्याच्या नावे या फॉरमॅटमध्ये 18,426 धावा आहेत.
सचिननंतर ही कामगिरी श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा यानं केली. संगाच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 14,234 धावा आहेत. या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करताच, या अद्भूत आकड्याला स्पर्श करणारा तो भारताचा केवळ दुसरा फलंदाज ठरेल.
विराटनं 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडला होता. विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज आहे. या फॉरमॅटमध्ये विराटच्या नावावर 50 शतकं आहेत. त्याच वेळी, सचिननं त्याच्या कारकिर्दीत 49 एकदिवसीय शतकं झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं झळकावणारा कोहली हा जगातील एकमेव फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोर्ने मोर्केल नाही! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाला मिळाले नवे गोलंदाजी प्रशिक्षक
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे किती खेळाडू भाग घेत आहेत? कोणत्या राज्यातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक?