भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटसह हा धुरंधर कसोटीतही दमदार प्रदर्शन करताना दिसतो. परंतु मागील काही काळापासून विराट त्याच्या लौकिकास साजेशी खेळी करू शकलेला नाही. इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जोफ्रा आर्चर आणि डॉम बेस यांच्यापुढे तो संघर्ष करताना दिसला. अखेर ४८ चेंडूत ११ धावा करत बेसच्या गोलंदाजीवर ओली पॉपच्या हातून तो झेलबाद झाला.
विराट कोहलीची दयनीय अवस्था
विराटने मागील ७ कसोटी डावात १८.१४ च्या सरासरीने अवघ्या १२७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने फक्त १ अर्धशतक केले आहे. जर वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमधील एकूण कामगिरी पाहायची झाली तर, विराटने गतवर्षीपासून (१ जानेवारी २०२०) २३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील २५ डावात फलंदाजी करताना त्याने ३५.५४ च्या सरासरीने ८५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो फक्त ७ अर्धशतके करू शकला आहे. यातील १४ डावात तो ३० पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे.
दुर्दैवी बाब म्हणजे, गतवर्षीपासून त्याला एकही शतक करता आलेले नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकाता येथे बांग्लादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक केले होते. तेव्हापासून आतापर्यंत विराटने ३१ डावात फलंदाजी केली असून एकदाही शतक केलेले नाही. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकही शतक न करता सर्वाधिक डाव खेळण्याची पहिली वेळ आहे. यापुर्वी २८ फेब्रुवारी २०१४ ते ११ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत शतकाविना विराटने २५ डाव खेळले होते.
विराटसारख्या फलंदाजासाठी ही अतिशय चिंताजनक बाब आहे. चेन्नईत चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघर्ष करताना दिसला. अशात सर्वांना या सामन्यातील दुसऱ्या डावात विराटकडून दमदार ‘कॅप्टन्सी इनिंग’ची आशा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चेतेश्वर पुजाराप्रमाणेच २० वर्षांपूर्वी सचिनही झाला होता दुर्दैवीरित्या बाद, पहा व्हिडिओ
कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३६ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम






