साउथँम्पटन। बुधवारी(5 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात साउथँम्पटनमधील रोज बॉल स्टेडीयमवर पार पडलेल्या आठव्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याने या सामन्यात 144 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 23 वे शतक आहे. त्याच्या या खेळीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. रोहितच्या या खेळीचे भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केले आहे.
सामना संपल्यानंतर विराट रोहितबद्दल म्हणाला, ‘मला वाटते की ही त्याची(रोहितची) सर्वोत्तम वनडे खेळी होती. कारण विश्वचषकाच्या दृष्टीने पहिल्या सामन्यात दबाव असतो. एक फलंदाज म्हणून मला माहित आहे, जेव्हा काही चेंडू बाऊन्स होतात तेव्हा स्वत:ला सावरुन शांतपणे खेळणे सोपे नसते.’
रोहितने ही शतकी खेळी करताना दाखवलेल्या परिपक्वतेचे कौतुक करताना पुढे विराट म्हणाला, ‘बऱ्याचदा फलंदाज परिस्थिती पाहून गडबडतो. पण तो शांत होता. त्याने खूप सामने खेळले आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्यासारख्या खेळाडूकडून जबाबदारीची आणि परिपक्वतेची अपेक्षा करतो. मला वाटते ज्याप्रकारे ही खेळी उभारली गेली, त्यामुळे ही सर्वोच्च खेळी होती.’
त्याचबरोबर रोहितने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या विकेटसाठी केएल राहुल(26) बरोबर 85 धावांची आणि एमएस धोनीबरोबर(34) चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली होती.
या भागीदारी करताना रोहितने सांभाळलेल्या एका बाजूबद्दल विराट म्हणाला, ‘मला वाटते सामन्यात एका बाजूने सुरेख नियंत्रण राखले गेले. दुसऱ्या खेळाडूला त्यांचा खेळ करण्याची मुभा देण्यात आली आणि काही छोट्या भागीदारी रचल्या गेल्या. हे खरे आहे की आम्ही 228 धावांचाच पाठलाग करत होतो पण त्याने ज्या परिस्थितीत ती खेळी केली ते चांगले होते.’
‘कोणत्याही क्षणी विकेट घेऊ शकेल अशी खेळपट्टी होती. त्यामुळे माझ्यासाठी ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.’
https://twitter.com/cricketworldcup/status/1136445510850625537
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–काय सांगता! डिविलियर्सला खेळायचा होता २०१९ चा विश्वचषक, पण…
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने मोडला ब्रेट लीचा तब्बल १५ वर्षांपूर्वीचा विक्रम
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले असे काही…






