भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. आज बुधवारी भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोहलीने 55 चेंडूत 52 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चौकार आणि एक षटकार मारला. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 73 वे अर्धशतक आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहलीच्या बॅटमधून झळकलेल्या अर्धशतकाने भारतीय संघ व्यवस्थापनाला नक्कीच दिलासा मिळाला असेल.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात मार्क वूडने कर्णधार रोहित शर्माला (1) बाद केले. यानंतर, कोहलीने शुबमन गिलसह जबाबदारी स्वीकारली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. कोहलीने 50 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 18 व्या षटकात लिव्हिंगस्टोनविरुद्ध षटकार मारला आणि नंतर एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले.
19 व्या षटकात कोहली चांगल्या लयीत दिसत होता. पण त्याला यष्टीरक्षक फिल साल्टने स्पिनर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याला पुढच्या पायावर बचाव करायचा होता. पण चेंडू बॅटच्या बाहेरील टोकाला लागला. रशीदने एकदिवसीय सामन्यात पाचव्यांदा कोहलीला बाद केले आहे. दुसऱ्या सामन्यातही त्याने कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्याच्या खेळीदरम्यान, कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले आहेत.
कोहली इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्या नावावर सध्या 4000 हून अधिक धावा आहेत. त्याने 90 डावांमध्ये ही कामगिरी केली. सचिनने इंग्लंडविरुद्धच्या कारकिर्दीत 90 डावांमध्ये 3990 धावा केल्या. तसेच, कोहली आशियातील सर्वात जलद 16 हजार धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने 340 डावांमध्ये ही कामगिरी केली. सचिनने आशियामध्ये 355 डावांमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या.
आशियामध्ये सर्वात जलद 16000 धावा करणारा खेळाडू.
340 डाव – विराट कोहली
360 डाव – कुमार संगकारा
401 डाव - महेला जयवर्धने
हेही वाचा-
IND vs ENG; शतक झळकावताच शुबमन गिलने इतिहास घडवला, भारताचा नवा स्टार..!
ICC वनडे रँकिंग: गिल चमकला, विराटची मोठी घसरण, रोहितचेही नुकसान
IND vs ENG: आजच्या सामन्यात होणार नवा विक्रम? रोहित-विराटला ऐतिहासिक संधी