टी-२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान सामना पार पडला. या सामन्यासाठी चाहते मागच्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. सामन्याची सुरुवात भारतीय संघासाठी काही खास ठरली नाही. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. असे असले तरी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि पाकिस्तानविरुद्ध त्याच्या नावावर एक नवीन विक्रमाचीही नोंद केली आहे.
विराटने या सामन्यात ४९ चेंडूंचा सामना केला आणि ५७ धावा केल्या. यामध्ये त्याच्या पाच चौकार आणि एका षटकाराचाही समावेश आहे. विराटने भारतीय संघासाठी या सामन्यात केलेल्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघ मर्यादित २० षटकात १५१ धावांपर्यंत मजल मारू शकला आहे.
विराटने या सामन्यात केलेल्या खेळीच्या जोरावर तो टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकात मिळून पाकिस्ताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने पाकिस्ताविरुद्ध दोन्ही विश्वचषकांमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. या सामन्यातील त्याच्या सात डावांमध्ये त्याने १०४.७५ ची सरासरी आणि १०७.१६ च्या स्ट्राइक रेटने ४१९ धावा केल्या आहेत.
विराट वनडे आणि टी२० विश्वचषक मिळून पाकिस्ताविरुद्ध ४०० धावांचा टप्पा पार करणारा जगातिल पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराटने ही कामगिरी एक शतक आणि तीन अर्धशतकांच्या जोरावर केली आहे. पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराटपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचा नंबर लागतो. सचिनने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये ३१३ धावा केल्या आहेत. सचिनने ही कामगिरी तीन अर्धशतकांच्या जोरावर केली आहे.
दरम्यान, रविवारी भारताने दिलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने १७.५ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केला. त्यांच्याकडून बाबार आझमने नाबाद ६८ आणि मोहम्मद रिझवानने नाबाद ७९ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित ‘नो’हिट! पाकिस्तानविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच, पण ‘हा’ नकोसा विक्रमही नावावर केला
शाकीब उल हसनने रचला इतिहास! टी२० विश्वचषकातील ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज
पाकिस्तानविरुद्ध भारतीय सलामीवीरांची साफ निराशा, आयसीसी स्पर्धेत तिसऱ्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट






