भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील १६ वा सामना खेळवला गेला. पाकिस्तानने हा सामना दहा गडी राखून सहज जिंकला. भारताने दिलेले १५२ धावांचे आव्हान पाकिस्तानने सहज पार केले. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने योग्य सिद्ध केला. पहिल्या षटकात शाहिनने रोहित शर्माला पायचीत करून माघारी धाडले तर आपल्या पुढच्या षटकात त्याने लोकेश राहुलला बाद करून खळबळ माजवली. पण दुसऱ्या टोकावर कर्णधार विराट कोहली टिकून राहिला आणि अर्धशतक झळकावले आणि एका विक्रमाला गवसणी देखील घातली.
विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने टी२० विश्वचषक सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके देखील झळकावले आहेत. विराटचे पाकिस्तान विरुद्ध हे तिसरे अर्धशतक ठरले. युवराज सिंग, गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी प्रत्येकी एकदा पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक लगावले आहेत. विराटने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम विराट कोहलीने नाणेफेक गमावली. त्यानंतर भारतीय संघाने सहा धावांच्या आत रोहित शर्मा (०) आणि केएल राहुल (३) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. सूर्यकुमार यादवने ११ धावा करून बाद झाला. त्याला हसन अलीने बाद केले. ५० धावा करण्यासाठी भारतीय संघाला तब्बल ९ षटके लागली.
रिषभ पंतला लेगस्पिनर शादाब खानने बाद केले. पंतने ३० चेंडूत ३९ धावा केल्या. कोहलीने ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले. तर, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रवींद्र जडेजा १३ धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्यालाही फक्त ११ धावा करता आल्या. कोहलीने ४९ चेंडूंचा सामना केला. आपल्या ५७ धावांच्या खेळीत त्याने ५ चौकार आणि एक षटकार लगावला. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १५१ धावा केल्या.
पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी पाकिस्तानला एकहाती सामना जिंकवून दिला. दोघांनी अर्धशतक झळकावले. बाबर आझमने ५२ चेंडूत ६८ धावा केल्या तर मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूत ७९ धावा केल्या. पाकिस्तान संघाने १७.५ षटकात भारतीय संघाने दिलेले १५२ धावांचे आव्हान पार केले.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्ध विराटची बॅट तळपतेच! विश्वचषकात ‘असा’ पराक्रम करणारा कोहली जगातील पहिलाच क्रिकेटर
रोहित ‘नो’हिट! पाकिस्तानविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच, पण ‘हा’ नकोसा विक्रमही नावावर केला
शाकीब उल हसनने रचला इतिहास! टी२० विश्वचषकातील ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज






