इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेगलोर पुन्हा एकदा विजेतेपद जिंकू शकला नाही. मुंबई इंडियन्सने दिग्गज कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आरसीबीला प्लेऑफमध्ये संधी मिळाली होती. याच सामन्यानंतर विराट कोहली याने एक ट्वीट केले होते, जे खूपच व्हायरल झालेले. या एका ट्वीटमुळे विराट कोहलीच्या नावावर सोशल मीडियाचा एक खास विक्रम नोंदवला गेला आहे.
भारतीय संघाचा आणि आयपीएल फ्रँचायझी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यावर्षीच्या हंगामात चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. असे असले तरी, सोशल मीडियावर मात्र विराटने सर्वांचे विक्रम मोडले. मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत केल्यानंतर आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. याच पार्श्वभूमीवर विराटने जे ट्वीट केले, या आयपीएल हंगामातील सर्वात जास्त वेळा रिट्वीट केले गेले आहे. चाहत्यांनी विराटचे हे ट्वीट तब्बल २७.८ हजार वेळा रिट्वीट केले आहे.
आयपीएल २०२२चा एलिमिनेटर आणि क्वालिफायर एक सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला होता. विराटने या ट्वीटमध्ये फक्त एक शब्द लिहिला होता, तो म्हणजे “कोलकाता.” सोबतच त्याने विमानाची इमोजी देखील टाकली होती. खालच्या बाजूला त्याने मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांना टॅग करून दोघांच्या मध्ये हात मिळवल्याची इमोजी देखील टाकली होती. त्याचे हे भन्नाट ट्वीट चाहत्यांनी चांगलेच व्हायरल केले.
मागच्या आठवड्यात आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर ट्विटरने मंगळवारी (३१ मे) हंगामात सर्वाधिक रिट्वीट मिळालेल्या ट्वीट्सची माहिती जाहीर केली. या माहितीनुसार विराट कोहलीचे हे ट्वीट पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचे नाव आहे. दिल्ली संघाला पराभूत केल्यानंतर मुंबई संघाने जे ट्वीट केले, ते तब्बल २५.४ हजार वेळा रिट्वीट केले गेले. मुंबई इंडियन्सचे हे ट्वीट संपूर्ण हंगामात दुसरे सर्वाधिक रिट्वीट केले गेलेले ट्वीट ठरले.
दरम्यान, आरसीबी संघ यावर्षी सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला होता आणि त्यामुळे माजी कर्णधार विराट खूपच आनंदात होता. पण त्याचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्सला मात देऊन दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले. परंतु दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांना धूळ चारली आणि अंतिम सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. यावर्षीचे विजेतेप नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सने पटकावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित अन् विराटला डच्चू देत भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकाचा संघ, पाहा कोणाला मिळालीय संधी