रविवारी(22 सप्टेंबर) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 9 विकेट्स दणदणीत विजय मिळवला. तसेच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारताचे क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतमध्ये फलंदाजीला जाण्यावरुन एक गोंधळ झाला होता.
झाले असे शिखर धवन बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पंत आणि अय्यर दोघेही एकाचवेळी फलंदाजीसाठी निघाले होते. पण नंतर अखेर पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला गेला. यावेळी भारताच्या 63 धावा झाल्या होत्या आणि कर्णधार विराट कोहली खेळपट्टीवर होता.
या गोंधळाबद्दल स्पष्टीकरण देताना कोहली म्हणाला, ‘मला वाटते त्यावेळी काहीतरी गैरसमज झाला. हेच मला नंतर कळाले.’
‘फलंदाजी प्रशिक्षकांनी त्या दोघांशी चर्चा केली होती. पण कोणत्यावेळी कोणी फलंदाजीला जायचे याबद्दल गैरसमज झाले. हे मजेशीर आहे कारण ते दोघेही फलंदाजीसाठी निघाले. त्यामुळे जर ते दोघेही मैदानात आले असते तर तीन फलंदाज मैदानात असण्याची गमतीशीर घटना घडली असती.’
तसेच चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार यासाठी योजना आखण्यात आली असल्याचे सांगताना विराट म्हणाला, ‘मला वाटते आम्ही ठरवले होते की 10 षटकांनंतर रिषभ फलंदाजीला येईल आणि जर त्याआधी गरज पडली तर श्रेयस फलंदाजीला येईल. पण मला वाटते त्या दोघांचाही गोंधळ झाला. त्यामुळे त्यांना कधी फलंदाजीला जायचे हे लक्षात आले नाही.’
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 134 धावा केल्या होत्या. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 19 धावा आणि हार्दिक पंड्याने 14 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त भारताकडून एकालाही या सामन्यात दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच बीजॉर्न फॉर्च्यून आणि ब्यूरान हेन्ड्रिक्सने प्रत्येकी 2 विकेट्स तर ताब्राईज शम्सीने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 16.5 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार क्विंटॉन डीकॉकने नाबाद 79 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला रिझा हेन्ड्रिक्सने 28 आणि तेंबा बाउमाने नाबाद 27 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारताकडून हार्दिक पंड्याने एकमेव विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मैदानावर पाऊल ठेवताच हिटमॅन रोहित शर्माने केली धोनीच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी
–विराट, रोहितचा समावेश असणाऱ्या या खास यादीत शिखर धवनही झाला समील






