या मालिकेत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघातील गोलंदाजांच्या वाढत्या वयामुळे गोलंदाजी फळीत बदल केले जाऊ शकतात, असे संकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दिले आहेत.
यामध्ये भारतीय संघाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुढील काही वर्षे संघासाठी गोलंदाजी करण्याची आशा आहे. परंतु यावर्षी सप्टेंबरमध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma) 32 वर्षांचा होईल. तर मोहम्मद शमी 29 वर्षांचा आहे आणि उमेश यादवही यावर्षी (Umesh Yadav) 33 वर्षांचा होईल. त्यामुळे आता वेगवान गोलंदाजांचे वाढते वय लक्षात घ्यावे लागेल असे विराटचे म्हणणे आहे.
भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला.
“या खेळाडूंचे आता वय वाढले आहे. त्यामुळे आम्हाला सावध आणि जागरूक रहावे लागेल. ही एक स्थिती आहे. ज्याचा आम्हाला सामना करावा लागू शकतो, हे आम्हाला स्विकारावे लागेल. तसेच यावेळी भारतीय संघात असे खेळाडू पाहिजेत, जे वय झालेल्या खेळाडूंची जागा घेतील,” असे पुढील वर्षांची रणनीती न लपविता विराटने सांगितले.
बुमराह सध्या 26 वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील योजनांकडे पाहता त्याच्याकडून अपेक्षा केल्या जात आहेत. त्याने आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यात त्याने एकूण 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 64 वनडे सामन्यांमध्ये 104 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच मागील दोन वर्षांतील शमीवरील ताण पाहता, गोलंदाजी फळीत बदल करण्यासाठी भारतीय संघाला तयार रहावे लागणार आहे.
नव्या खेळाडूंवर लक्ष देण्याचे संकेत देत विराट म्हणाला की, “आम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे की, पुढील 3-4 खेळाडू कोण असतील, जे भारतीय संघाच्या गोलंदाजीचा दर्जा नियंत्रित करतील. कारण असे व्हायला नको की, कोणताही गोलंदाज संघातून बाहेर पडला तर त्याची कमतरता आपल्याला जाणवेल.”
“नवदीप सैनी (Navdeep Saini) भारतीय संघाचा भाग बनला आहे. याव्यतिरिक्त 2 किंवा 3 खेळाडूंवर आमचे लक्ष आहे. आम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. तसेच हे समजून घेतले पाहिजे की, यामुळे (वेगवान गोलंदाजांमुळे) आम्हाला खूप यश मिळाले आहे. तसेच हा दर्जा असाच कायम राहील याची खात्री करण्याची गरज आहे,” असेही विराट यावेळी म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा ट्रेंट बोल्ट चक्क कांद्यावर करतो स्वाक्षरी, पहा व्हिडिओ
–‘थाला’ धोनीला पाहण्यासाठी चपॉक स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी; धोनीची सरावाला सुरुवात
–विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त मोठा धक्का