भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्या (२६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे माघारी परतला आहे. त्यामुळे उर्वरित कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करताना दिसेल.
मात्र मायदेशी परतण्यापूर्वी कोहलीने संघाला खास संदेश देत संघाचे मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला होता. नुकतेच अजिंक्य रहाणेने या गोष्टीचा खुलासा केला आहे. मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वीच्या आभासी पत्रकार परिषदेत रहाणे बोलत होता.
“सकारात्मक दृष्टीकोन ठेवा”
विराट कोहलीने उर्वरित कसोटी मालिकेसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला संघाला दिला होता, असा खुलासा अजिंक्य रहाणेने केला. रहाणे म्हणाला, “विराट कोहलीने अॅडलेड मधून निघण्याआधी आमच्याशी संवाद साधला होता. उर्वरित मालिकेसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला त्याने दिला. तसेच प्रत्येकाने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून एक संघ म्हणून एकजूट होऊन खेळावे, जे आम्ही संघ म्हणून गेली काही वर्षे सातत्याने करत आहोत, असेही त्याने सांगितले होते.”
मागील कसोटी सामन्यातील दारूण पराभवातून सावरत असल्याबाबत बोलताना रहाणे म्हणाला, “मागच्या सामन्यात आम्ही दोन दिवस उत्तम प्रदर्शन केले होते, परंतु केवळ एका तासातील खराब कामगिरीने ते गमावले. त्यामुळे या आठवड्यात आमचा भर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यावर राहिला आहे. आम्हाला संघ म्हणून आमच्या ताकदीनुसार खेळ करण्याची गरज आहे. दुसऱ्या सामन्यात आम्हाला पहिल्या दिवशी चांगली सुरुवात करणे आवश्यक असेल.”
शनिवारपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पुनरागमन करण्याचे कडवे आव्हान भारतीय संघासमोर असेल. पहिल्या सामन्यात अनपेक्षित पराभव पत्करावा लागला असला तरी भारतीय संघ मालिकेत नक्कीच पुनरागमन करू शकतो, असे ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने देखील म्हंटले आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या संदेशातून प्रेरणा घेत भारतीय संघ नव्या जोमाने दुसऱ्या कसोटीत उतरेल, अशी समस्त भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा आहे.
महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, हे दोन खेळाडू करणार पदार्पण
– तो काहीही करू शकतो, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका
– केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादमधून होणार बाहेर? वॉर्नरने दिले हे’ उत्तर