कोलकाता। भारतीय संघाने काल(24 नोव्हेंबर) इडन गार्डनवर बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताला(India) कसोटी चॅम्पियनशीपचे 60 गुण मिळाले आहेत.
त्यामुळे आता भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या(World Test Championship) गुणतालिकेत 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियापेक्षा 244 गुणांनी पुढे आहे.
त्यामुळे भारताकडे सध्या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये मोठी आघाडी आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) म्हटले आहे की संघांची त्यांच्या गुणांवरुन पारख करु नये.
विराट कोलकाताचा कसोटीनंतर म्हणाला, ‘आपण अॅशेस पाहिली, त्या मालिकेत जिंकण्याची जिद्द होती. त्यामुळे एखाद्या संघाबद्दल मत मांडणे कठीण आहे.’
तसेच कसोटी चॅम्पियनशिपचे स्वरुप(Format) संतुलित असायला हवे, असे सांगताना विराट म्हणाला, ‘मला वाटते की मायदेशात एक आणि परदेशात एक मालिका खेळणे हे अधिक संतुलित स्वरूप असेल. आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळत आहोत पण आम्ही परदेशात फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत.’
‘तूम्ही आमच्या संघाच्या कामगिरीचे कौतुक करु शकता, पण हे सांगणे योग्य नाही की आम्ही इतर कोणत्याही संघापेक्षा अधिक वर्चस्व गाजवत आहोत. जर आम्ही परदेशात दोन मालिका खेळल्या असत्या आणि आमच्याकडे 300 गुण असते तर तूम्ही म्हणू शकता आम्ही चांगला खेळ केला.’
‘आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत पण मला असे वाटत नाही की कोणत्याही संघाला कोणतेही टॅग जोडलेले असावेत. एक मायदेशातील मालिका आणि एक परदेशातील मालिका संतुलन ठेवू शकते.’
कोलकाता कसोटीतील विजय हा भारताचा कसोटीतील सलग चौथा एका डावाने मिळवलेला विजय आहे. त्यामुळे कसोटीत सलग 4 सामने एका डावाने जिंकणारा भारत पहिला संघ आहे. तसेच भारताने मायदेशात सलग 12 वी कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम केला आहे.
भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या आत्तापर्यंत 3 मालिका खेळल्या आहेत. यात वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकांचा समावेश आहे. यातील दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धची मालिका भारताने मायदेशात खेळली आहे.
…म्हणून गावस्कर म्हणाले, विराट कोहलीच्या जन्माआधीही जिंकत होती टीम इंडिया!
वाचा????https://t.co/Y4pvNuFCq3????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBallTest #ViratKohli #SunilGavaskar— Maha Sports (@Maha_Sports) November 25, 2019





