14 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश या संघात 2 सामन्यांची कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यातील पहिला सामना इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
कारण हा भारताचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना ईडन गार्डन्स कोलकातामध्ये शुक्रवारी (22 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे.
दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) म्हणाले की, बांगलादेशविरुद्ध दिवस – रात्र कसोटी सामना खेळण्याबद्दल विचारले असता भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) फक्त 3 सेकंदात संमती दिली होती.
सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष बनल्यानंतर एका आठवड्याच्या आत दिवस – रात्र कसोटी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तीन वर्षांपूर्वी गांगुली जेव्हा तांत्रिक समिती अध्यक्ष होता, त्यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिवस-रात्र सामने खेळले गेले होते.
यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिला दिवस – रात्र कसोटी सामना चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता.
तसेच 24 ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या निवड समीतीच्या बैठकीआधी विराटशी झालेल्या भेटीबद्दल गांगुलीने सांगितले की ‘ईमानदारीेने सांगायचं झालं तर, मला नाही माहिती एडिलेडमध्ये आयोजित करण्यात आलेला दिवस – रात्र कसोटी सामना भारतीय संघ का खेळला नाही. मी त्याच्याशी तब्बल एक तास चर्चा केली आणि पहिला प्रश्न विचारला की आपल्याला दिवस – रात्र कसोटी सामना खेळायचा आहे. यावर विराटने 3 सेकंदात उत्तर दिले की ठिक आहे आपण करु.’
गांगुली दिग्गज पंच सायमन टफेल यांच्या ‘फाईंडिंद द गॅप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी कोलकातामध्ये बोलत होते.
मागीलवर्षी भारतीय संघाने एडिलेड ओवलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता.
याबद्दल गांगुली म्हणाला, ‘मला नाही माहिती की यापूर्वी काय झाले होते आणि त्याची कारणे काय होती. परंतुु, मी कोहलीला दिवस – रात्र कसोटी खेळण्यासाठी विचारल्यावर कोहलीने होकार दिला आहे. कोहलीला कळाले आहे की केवळ फार थोड्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत कसोटी क्रिकेटला पुढे घेऊन जाणे योग्य नाही.’
त्याचबरोबर गांगुली म्हणाला, ‘मला हे माहिती आहे की टी20 सामन्यांमध्ये प्रत्येक स्टँड प्रेक्षकांनी गच्च भरलेले असते. परंतु, कसोटी सामन्यात योग्य व्यवस्थापन केले की, प्रेक्षकांचे पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळू शकतात. ही तर भारताची सुरुवात आहे. मला असे वाटते की, यामुळे कसोटी क्रिकेटला चांगले दिवस येतील.’






