भारतीय क्रिकेट संघाच्या नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. टीम इंडिया सध्या टी20 विश्वचषकात व्यस्त आहे. विश्वचषकानंतर संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपेल. मात्र द्रविडनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक कोण होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनणार हे निश्चित आहे. परंतु आता समोर आलेली माहिती धक्कादायक आहे, ज्यामध्ये गंभीरच्या आधी व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
वास्तविक, टी20 विश्वचषक 2024 नंतर टीम इंडिया 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण या दौऱ्यावर टीम इंडियासोबत जाऊ शकतात. जरी गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला, तरी तो झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियासोबत जाणार नाही. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं ‘पीटीआय’ला सांगितलं की, “व्हीव्हीएस लक्ष्मण काही एनसीए प्रशिक्षकांसह झिम्बाब्वेला जाण्याची शक्यता आहे. राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जेव्हा-जेव्हा ब्रेक घेतला, तेव्हा-तेव्हा लक्ष्मण यांनी भारतीय संघाची जबाबदारी सांभाळली आहे.”
गौतम गंभीर जर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला, तर तो श्रीलंका दौऱ्यापासून संघाची जबाबदारी सांभाळेल. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. आता या दौऱ्यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट विश्वचषकात मिचेल स्टार्कचा दबदबा! या बाबतीत टाकलं सर्व दिग्गजांना मागे
विराट कोहलीचा विश्वविक्रम धोक्यात, सूर्यकुमार यादवनं अवघ्या 64 सामन्यांत रचला इतिहास!
टी20 विश्वचषक 2024 मधील पहिली हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात घडला इतिहास