-महेश वाघमारे
क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जातो. पण,२००० नंतर स्लेजिंग आणि इतर कुरापती काढण्याचे फॅडच आले. ऑस्ट्रेलिया त्यात नेहमी अव्वल राहिली. अझरुद्दीनच्या प्रकरणानंतर सौरव गांगुली भारताचा कर्णधार झाला. भारतीय खेळाडू सुद्धा “अरे” ला “का रे” करू लागले. हरभजन, सेहवाग, युवराज आणि स्वतः गांगुली देखील त्यात पुढाकार घेत. पण,सचिन द्रविड आणि लक्ष्मण मात्र या गोष्टींपासून अलिप्त राहात. सचिन, द्रविडचे नाव तरी बॉल टेम्परिंग, पाकिस्तान दौऱ्यातील डाव घोषित करण्याचा निर्णय अशा एखाद वादाशी जोडले गेले होते परंतु लक्ष्मण मात्र साध्या क्षुल्लक वादापासूनही मैलो दूर होता. एकदम सज्जन म्हणून तो क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध झाला होता.
२००६ साली भारतीय संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तीन सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत उभी होती. तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीचा चौथा दिवस होता. भारताचा दुसरा डाव सुरू झाला. पहिल्या डावात ४१ धावांची लीड भारताला मिळाली होती. हा सामना जिंकून एक ऐतिहासिक मालिका जिंकण्याचे स्वप्न राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाहत होता.
सेहवाग, जाफर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, गांगुली आणि दिनेश कार्तिक अशी लांबलचक आणि भक्कम फलंदाजांची फळी होती. भारताने उरलेल्या वेळात झटपट अधिकाधिक रन्स काढून आफ्रिकेला चौथ्या डावात लवकर बाद करण्याची योजना आखली. फलंदाजीचा क्रम देखील ठरलेलाच होता.
सेहवाग आणि वासिम जाफर ही सलामी जोडी मैदानावर उतरली. पण दुसऱ्याच षटकात डेल स्टेनने सेहवागला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. जाफरच्या साथीला कर्णधार द्रविड आला. ही जोडी जमायचा आधीच पुढच्या षटकात मखाया एन्टिनीने जाफरला चकवत माघारी धाडले. त्यानंतर मात्र खरी मजा सुरू झाली.
पंच असद रौफ आणि सचिनवर ‘खास प्रेम’ असलेले डॅरिल हार्पर यांनी सचिनला मैदानावर येण्यापासून रोखले. आदल्या दिवशी सचिन क्षेत्ररक्षण करताना दहा मिनिटे मैदानाबाहेर होता आणि कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार, तो आता अजून दहा मिनिटे फलंदाजीला येऊ शकत नव्हता. हा ‘असलेला’ परंतु ‘तितकासा माहीत नसलेला’ नियम दोन्ही पंचांनी काढल्यावर मात्र भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पळापळ सुरू झाली.
ठरल्याप्रमाणे, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला जाणारा व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) कुठे दिसत नव्हता. सगळे खेळाडू त्याला शोधू लागले. त्यात हरभजनला तो बाथरूम मध्ये शॉवर घेताना दिसला. हरभजनने त्याला बाहेर चाललेल्या गोंधळाबाबत सांगितले.
त्यावेळी भारतीय संघात हरभजन, युवराज आणि सेहवाग हे इथं खेळाडूंची मजा घेत. त्यामुळे, लक्ष्मणने हरभजनच्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आपले गाणे गुणगुणत आंघोळ करू लागला. खाली मैदानावर द. आफ्रिकेची टीम, प्रेक्षक व स्वतः कर्णधार राहुल द्रविड विचार करत होते की कोणी खेळायला का येईना? द्रविडला बाराव्या खेळाडूने आतमध्ये सुरू असलेला प्रसंग सांगितला.
आता पुन्हा दुसरा नियम
कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार, तीन मिनिटाच्या आतमध्ये जर फलंदाज फलंदाजीला आला नाही तर तो बाद दिला जातो.
हरभजनने लक्ष्मण ऐकत नसल्याचे सचिनला येऊन सांगितले. सचिन पटकन बाथरूमकडे गेला. तेव्हा लक्ष्मण अंगाला साबण लावून उभा होता. सचिनने त्याला इमर्जन्सी सांगितली. सचिनवर विश्वास ठेवत लक्ष्मण झटपट आवरु लागला. पण इकडे, गांगुलीला फलंदाजीला पाठवायची तयारी झाली होती. सचिन त्याचे पॅड बांधत होता, कोणी शर्ट घालायला मदत करत होता, तर कोणी शू लेस बांधत होत. कोच चॅपेलने हेल्मेट गांगुलीच्या डोक्यावर चढवले. आपली बॅटिंग लवकर येणार नाही म्हणून गांगुली निर्धास्त होता.
गांगुली मैदानावर जाणार इतक्यात लक्ष्मण बाहेर आला. त्याला पाहून गांगुलीने तोंडातील तोंडात एक दोन शिव्या दिल्या.
आता अजून एक प्रॉब्लेम होता. भारतीय संघाची नजर मैदानावर होती कारण गांगुलीला मैदानावर जाण्यास तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला होता. द. आफ्रिकेचे खेळाडू उशिरा फलंदाज गेल्यामुळे अपील करणारा आणि गांगुलीला एकही चेंडू न खेळता माघारी परतावे लागणार असे सर्वांना वाटत होते परंतु द्रविडने आतमध्ये उद्भवलेली परिस्थिती द. आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ याला सांगितली होती आणि त्याने खिलाडूवृत्ती दाखवत अपील न करण्याचे आश्वासन दिले होते.
लक्ष्मणच्या आंघोळीमुळे, अचानक उद्भवलेला पेचप्रसंग टळला होता. त्यानंतर भारताचा डाव सुरू असल्यावर कोणीही शॉवर घेणार नाही असा आदेशात कोच चॅपेलने काढला. पुढे तो सामना अनिर्णित राहिला.
आजही अनेकदा, समालोचन करताना सौरव गांगुली, सचिन किंवा त्यावेळचे खेळाडू हा किस्सा सांगताना लक्ष्मणची खिचाई करत पोट धरून हसतात.
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते