भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवत ३-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावे केली. या सामन्यात शतक हुकलेल्या भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुंदरचे हुकले शतक
अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीत भारतीय संघाकडून रिषभ पंतने शतक ठोकले. त्यानंतर, आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने देखील नाबाद ९६ धावांची सर्वांगसुंदर खेळी केली. सुंदरने सुरुवातीला रिषभ पंतसोबत सातव्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली. त्यानंतरही, अक्षर पटेलसोबत आठव्या गड्यासाठी त्याने १०६ धावा जोडल्या.
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात सुंदर आरामात आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक साजरे करेल असे वाटत असताना, आवश्यकता नसतानाही अक्षर पटेल धाव घेण्यासाठी धावला आणि धावबाद झाला. पुढील षटकात तीन चेंडूंच्या अंतरात ईशांत शर्मा व मोहमद सिराज यांना बाद करत बेन स्टोक्सने भारताचा डाव गुंडाळला. दुर्दैवाने, वॉशिंग्टन सुंदर नॉन स्ट्राइकला असल्याने ९६ धावांवर नाबाद राहिला.
शतक हुकल्यानंतर सुंदरने दिली प्रतिक्रिया
साथीदार शिल्लक न राहिल्याने सुंदरला आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावत आले नाही. त्याविषयी बोलताना सुंदर म्हणाला, “मायदेशात पहिली कसोटी मालिका जिंकणे आनंददायी आहे. शतक हुकल्याचे मला अजिबात दुःख नाही. ज्यावेळी, योग्य वेळ येईल तेव्हा माझे शतक नक्कीच होईल. संघाच्या विजयात योगदान दिल्याचा आनंद आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त होती. स्टोक्स आणि अँडरसन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.” सुंदरने या सामन्यात गोलंदाजी करताना एक बळी देखील मिळवला होता.
पदार्पणापासून चमकत आहे सुंदर
वॉशिंग्टन सुंदर आपल्या कसोटी पदार्पणापासून चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अखेरच्या कसोटी सामन्यात अचानक संधी मिळाल्यानंतर ही त्याने शार्दुल ठाकूरसोबत मॅचविनिंग भागीदारी करताना अर्धशतक साजरे केले होते. सुंदरने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत ४ कसोटी सामने खेळताना ६६.२५ च्या सरासरीने तीन अर्धशतकांच्या मदतीने २६७ धावा फटकावल्या आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याच्या नावे ६ बळीदेखील जमा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे अभिनंदन करताना सेहवागचे ‘हटके’ ट्विट; म्हणाला, ‘इंग्लंड अहमदाबादमध्ये हरला नाही तर…’
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कर्णधारांच्या ‘या’ यादीत पटकावले दुसरे स्थान