---Advertisement---

‘पुढील आयपीएल हंगामाआधी ‘या’ युवांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे”; माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 12:12 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने देखील ट्विट करत काही खेळाडूंचे कौतुक केले आहे.

जाफरने केले ट्विट

दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यर याने तुफानी अर्धशतकी खेळी केली होती.या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.ही कामगिरी पाहून, वसीम जाफरने अनकॅप खेळाडूंबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, “अनकॅप खेळाडूंची अशी कामगिरी पाहून खूप आनंद होत आहे. माझ्या मते या युवा खेळाडूंना कमी लेखलं जातं. व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, आवेश खान, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, हरप्रीत बरार, उमरान मलिक, हर्षल पटेल आणि यशस्वी जयस्वाल यांनी या हंगामात वेगळी कामगिरी केली आहे. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी यापैकी काही खेळाडूंनी भारतीय संघासाठी पदार्पण केले पाहिजे.”

व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तर, आवेश खान आणि हर्षल पटेल यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तसेच पंजाब किंग्स संघाकडून रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. तर राजस्थान रॉयल्स संघासाठी यशस्वी जयस्वाल आणि सनरायझर्स हैदराबाद संघासाठी उमरान मलिक यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे.

टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर २ दिवसांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, या मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन, युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---