दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुन्हा एकदा यजमानांनी बाजी मारली आहे. विजयासह मालिकेचा श्रीगणेशा करणारा पाहुणा भारतीय संघ पुढील २ सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करू शकला नाही. परिणामी त्यांना १-२ ने ही मालिका गमवावी लागली आहे. यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने भारताचा माजी रणजीपटू वसिम जाफर (Wasim Jaffer) याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला (Vaughan Tried To Troll Jaffer) आहे. परंतु नेहमीप्रमाणे जाफरने वॉनला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याचे तोंड बंद केले आहे.
केपटाऊन येथील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला. यानंतर वॉनने ट्वीट करत लिहिले की, ‘शुभ संध्याकाळ जाफर. फक्त बघतोय की, तू ठीक आहेस का?.’
वॉनच्या या ट्वीटवर जाफरने रिऍक्ट केले आहे आणि मजेशीर अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे. जाफरने प्रत्युत्तर देताना लिहिले आहे की, ‘हाहा.. सर्वकाही ठीक आहे मायकल. पण विसरू नकोस, आम्ही अजूनही तुमच्यापेक्षा २-१ ने पुढे आहोत.’ यापुढे जाफरने हसतानाचा इमोजीही जोडला आहे.
Haha all good Michael, don't forget we are still leading you 2-1 😆 https://t.co/vjPxot43mF
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) January 14, 2022
जाफरने हा टोमणा इंग्लंड आणि भारत संघातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेवरून मारला आहे. गतवर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, जिथे त्यांनी कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली होती. परंतु या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होण्यापूर्वी भारताच्या ताफ्यात कोरोनाने प्रवेश केला होता, ज्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. आता हा शेवटचा कसोटी सामना १ जुलै ते ५ जुलै २०२२ दरम्यान बर्मिंघम येथे खेळवला जाईल. या सामन्यावरून मालिकेचा निकाल लागेल.
व्हिडिओ पाहा-
दरम्यान जाफर आणि वॉनने एकमेकांवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. वॉन आणि जाफर एकमेकांना ट्रोल करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अशात जेव्हा भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकत इतिहास रचण्याची संधी होती. परंतु ते त्यात अपयशी ठरले. त्यानंतर इंग्लंडच्या या माजी क्रिकेटरने जाफरला ट्रोल करणे साहजिक होते.
भारतीय संघाच्या या मालिकेतील प्रदर्शनाविषयी बोलायचे झाल्यास, सेंच्यूरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ११३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. परंतु पुढे दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाला ७ विकेट्सने पराभवास सामोरे जावे लागले. हा सामना जोहान्सबर्ग येथे झाला होता. त्यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केपटाऊन येथे झाला, ज्यामध्ये पुन्हा दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्स राखून भारताला धूळ चारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केपटाऊन कसोटीतील डीआरएसच्या वादानंतर भारतीय खेळाडूंवर होणार कारवाई? वाचा सविस्तर
भारताचे ‘यंगिस्तान’ आजपासून सुरू करणार १९ वर्षांखालील विश्वचषकातील अभियान, जाणून घ्या वेळापत्रक
‘संघाची निवड माझे काम नाही’, कर्णधार कोहलीचे पुजारा-रहाणेच्या भविष्याच्या प्रश्नावर चोख प्रत्युत्तर
हेही पाहा-