भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाज थोडे महाग ठरत असताना आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. एक वेळ अशी ही आली होती, ज्यावेळी असे वाटत होते की, न्यूझीलंड संघ १८०-१९० धावा करेल. परंतु, त्यांना अवघ्या १५३ धावा करण्यात यश आले. आर अश्विनच्या अप्रतिम गोलंदाजी नंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने एक मिम शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवला. त्याने योग्यवेळी योग्य गोलंदाजाचा वापर केला होता. आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी मधल्या षटकांमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली होती.
वसीम जाफर हे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतात. ते नेहमी मजेशीर मीम शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. नुकताच त्यांनी एक मीम शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन फोटो आहेत. एका फोटोमध्ये बर्गर दिसतोय आणि त्यामध्ये बर्गरच्या बाहेर चीज आल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकाल की, चीज खूप कमी आहे. अगदी दाखवण्या इतकचं आहे.
यावर कॅप्शन देत वसीम जाफर यांनी लिहिले की, “एकदा अश्विनने मला त्याच्या घरी पनीर बर्गर खाण्यासाठी बोलावले होते आणि मला हे खायला दिले होते, अश्विनच्या किफायतशीर गोलंदाजीने मला फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण तो चांगला किफायतशीर आहे.” आर अश्विनने मालिकेतील २ सामन्यात ८ षटक गोलंदाजी करत ५.२५ च्या सरासरीने ४२ धावा देत ३ गडी बाद केले आहेत.
तसेच दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली होती, तर मार्टिन गप्टीलने ३१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटकांअखेर ६ बाद १५३ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने ५५ धावांचे योगदान दिले होते. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीला चेन्नईत खेळता येणार अखेरचा टी२० सामना? जय शाह यांनी केले मोठे भाष्य
अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात
टी२० मालिकेनंतर ‘हे’ दोघे करणार दक्षिण आफ्रिकेला प्रयाण; शार्दुलचाही होऊ शकतो समावेश





