सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेची सुरुवात गुरुवारी (२ जून) ऐतिहासिक लॉर्ड स्टेडियमवर झाली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी विकेट्सची चांगलीच पडझड पाहायला मिळाली. न्यूझीलंडचा पहिला डाव सामन्याचा पहिल्या दिवशी आटोपला, तर इंग्लंडचा देखील अर्धा संघ तंबूत परतला. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी दिग्गज वसीम जाफर याने एक मजेशीर मीम शेअर केले आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ 1st Test) यांच्यातील या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. खेळपट्टीवर गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व केल्याचे पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने अवघ्या १३२ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या, तर दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ११६ धावांवर त्यांच्या ७ विकेट्स गमावल्या. म्हणजेच दोन्ही संघांच्या मिळून पहिल्या दिवशी तब्बल १७ खेळाडूंनी लॉर्ड्स स्टेडियमवर (Lord’s Cricket Stadium) विकेट्स गमावल्या. याच पार्श्वभूमीवर वसीम जाफरने निशाणा साधला आहे.
वसीम जाफर (Wasim Jaffer) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि नेहमीच मजेशीर मीम्स शेअर करत असतो. लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी १७ विकेट्स पडल्याचे जाफरच्या मनाला काही पडलेले दिसत नाही. याच कारणास्तव त्याने समलान खानचे एक मजेशीर मीम शेअर केले आहे. मीममध्ये लिहिले आहे की, “हम करे तो साला कॅरेक्टर ढिला है.” हे सलमानच्या एका चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत, जे लॉर्ड्सवरील सध्याच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होतात. कारण, यापूर्वी भारतात जेव्हा कधी अशा प्रकारे झटपट विकेट्स पडल्या, तेव्हा बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
जाफरने या ट्विटर पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा लॉर्ड्सवर एका दिवसात १७ विकेट्स पडतात, तेव्हा गोलंदाजांच्या कौशल्याविषयी बोलले जाते, पण जेव्हा अहमदाबादमध्ये एका दिवसात १७ विकेट्स पडतात, तेव्हा त्याठिकाणच्या परिस्थितीविषयी बोलले जाते.” जाफरच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आल्या आहेत. कमेंट्सच्या माध्यमांतून अनेकजण व्यक्त होत आहेत.
When 17 wkts fall in a day at Lord's, talk is about skills of the bowlers.
When 17 wkts fall in a day at Ahmedabad, talk is about conditions. #ENGvNZ pic.twitter.com/2sl4n26Cn3
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 3, 2022
दरम्यान, उभय संघातील सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा संघ जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्स यांच्या भेदक माऱ्यामुळे अवघ्या १३२ धावांवर सर्वबाद झाला. या दोघांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ देखील पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला. पहिल्या दिवशी ७ विकेट्स गमावल्यानंतर इंग्लंडचा डाव दुसऱ्या दिवशी अवघ्या १४१ धावांवर गुंडाळला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जर भारतात पहिल्या दिवशी १७ विकेट पडल्या असत्या, तर…’, दिग्गजाचा इंग्लंडवर निशाणा
‘तुमच्या प्रामाणिकपणावरच प्रश्न उपस्थित केल्यावर दु:ख होते’, संघाची साथ सोडल्यानंतर हळहळला साहा
खेळाडूला ‘या’ गोष्टीचा अभिमान असावा; धोनीचा नवख्या क्रिकेटर्सला मोलाचा संदेश