इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL) हंगामाचे बिगूल वाजायला सुरुवात झाली आहे. या हंगामातील सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. पण, याआधीच माजी क्रिकेटपटू वासिम जाफर (Wasim Jaffer) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो आयपीएलमधील पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरून पायउतार होत असल्याचे त्याने सांगितले आहे.
अनोख्या शैलीत जाफरचा पंजाब किंग्सला अलविदा
वासिम जाफर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो अनेकदा विविध गोष्टींवर मीमच्या माध्यमांतून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. त्याने पंजाब किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद सोडताना देखील मीमचा आधार घेतला आहे.
जाफरने सोशल मीडियावर ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूर याचा फोटो असलेले मीम शेअर केले आहे. त्यावर लिहिले आहे की, ‘अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना.’ तसेच या मीमच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘बाय आणि धन्यवाद पंजाब किंग्स. तुमच्यासोबत काम करताना आनंद वाटला. अनिल कुंबळे आणि संघाला आयपीएल २०२२ साठी शुभेच्छा.’
कुंबळे पंजाब किंग्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. जाफरच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत.
https://twitter.com/WasimJaffer14/status/1491804547127201805
जाफर २०१९ साली पंजाब किंग्स संघाशी जोडला गेला होता. तेव्हा पासून तो पंजाब किंग्स संघाच्या सपोर्ट स्टाफचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. पण तीन वर्षे संघाबरोबर काम केल्यानंतर त्याने आता आपला मार्ग संघापासून वेगळा केला आहे.
पंजाब किंग्ससाठी आयपीएल २०२२ चा लिलाव महत्त्वाचा असणार आहे. त्यांनी या आयपीएल हंगामासाठी मंयक अगरवाल आणि अर्शदीप सिंग यांना अनुक्रमे १२ आणि ४ कोटी रुपयांना संघात कामय केले आहे. त्यामुळे संघात तब्बल २३ खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे. हे २३ खेळाडूंची जागा पंजाबला लिलावातून भरुन काढावे लागणार आहे. लिलावासाठी पंजाबकडे ७२ कोटी रुपये आहेत.
जाफरची कारकिर्द
जाफरने भारताकडून ३१ कसोटी आणि २ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटी त्याने १९४४ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना २ विकेट्सही घेतल्या आहेत. तर वनडे सामन्यात त्याने केवळ १० धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना त्याने २६० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १९४१० धावा केल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने सर्वाधिक नाबाद ३१४ धावा केल्या आहेत. तर ११८ अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ४८४९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvWI: तिसऱ्या वनडेत भारताने जिंकला टॉस, ११ जणांच्या संघातून केएल राहुलसह ४ खेळाडू बाहेर
आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ३ खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी, तर १० जणांवर करडी नजर
हिटमॅनला पराक्रमाची संधी! अवघ्या १४ धावा करताच रोहित तोडणार गांगुली-तेंडुलकरचा मोठा विक्रम






