बहुप्रतिक्षित आशिया चषक २०२२ स्पर्धेची सुरुवात शनिवारपासून (२७ ऑगस्ट) होणार आहे. या स्पर्धेसाठी ५ संघांची नावे आधीपासूनच निश्चित होती. मात्र एका जागेसाठी ४ संघांमध्ये ओमानमध्ये पात्रता फेरी खेळली आणि या फेरीत हाँगकाँग संघाने बाजी मारत मुख्य स्पर्धेत प्रवेश केला आहे. यानंतर हाँगकाँग संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आशिया चषकासाठी पात्र ठरलेल्या हाँगकाँगच्या खेळाडूंनी ‘काला चष्मा’ या हिंदी गाण्यावर डान्स करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.
आशिया चषकासाठीची (Asia Cup 2022) पात्रता फेरी ओमान येथे खेळली गेली. चार संघांच्या या पात्रता फेरीतून एक संघ मुख्य स्पर्धेत दाखल होणार होता. अखेरच्या सामन्यापर्यंत चुरशीच्या झालेल्या या पात्रता फेरीत हॉंगकॉंगने (Hongkong) सातत्यपूर्ण कामगिरी करत मुख्य स्पर्धेत धडक मारली. युएई विरूद्ध आपला तिसरा सामना ८ गड्यांनी खिशात घालत त्यांनी मुख्य स्पर्धेचे तिकीट मिळवले.
मुख्य स्पर्धेतील एका जागेसाठी ओमान येथे युएई, हॉंगकॉंग, कुवेत व सिंगापूर यांच्या दरम्यान पात्रता फेरी खेळली गेली. अखेरच्या दिवशी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात कुवेतने १०४ धावांचे आव्हान केवळ ७.५ षटकात पूर्ण करत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. त्यांचा हा दुसरा विजय होता. त्यानंतर अखेरच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हॉंगकॉंगला सलग तिसरा विजय मिळवून मुख्य फेरीत जाण्याची सुवर्णसंधी होती. त्यांनी ही संधी साधली आणि आशिया चषकासाठी आपला दावा ठोकला.
या यशाचा हाँगकाँग संघाने जोरदार आनंद साजरा (Hongkong Team Celebration) केला. त्यांनी ‘बार बार देखो’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘काला चष्मा’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक फलंदाज झीशन अलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, केवळ खेळाडूच नव्हे तर हाँगकाँग संघाचे प्रशिक्षकही खेळाडूंसोबत काला चष्मा गाण्यावर थिरकत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे.
https://www.instagram.com/reel/Chrs1NqgAi_/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान आता मुख्य फेरीत हाँगकाँगचा सामना अ गटात भारत व पाकिस्तान यांच्यासोबत होणार आहे. दुसरीकडे ब गटात बांगलादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान दोन हात करतील. ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
असा सामना पुन्हा होणे नाही! ९२ धावांवर डाव घोषित करुनही एक डाव अन् २७ धावांनी जिंकली मॅच
भारताची प्लेइंग इलेव्हन ‘फुटली’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बीसीसीआयने जाहीर केलाय संघ?
बीसीसीआय अध्यक्ष म्हणतायेत, “आता विराटला स्वतःसाठी धावा कराव्या लागतील”