ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील ऍशेस कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. या प्रतिष्ठित मालिकेसाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार सराव सुरू केला असून, यादरम्यान संघाने अनेक सराव सामन्यांमध्येही सहभाग घेतला. मात्र, इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीशिवाय ऑफस्पिनर नॅथन लायनचा मोठा धोका आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने खुलासा केला आहे की, लायनला सामोरे जाण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज अप्रत्यक्षपणे भारतीय संघाची मदत घेत आहेत.
ब्रॉडला वाटते की, दर्जेदार वेगवान आक्रमण असूनही, लायन हाच ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ब्रॉड म्हणाला, ”आम्ही अभ्यास केला आहे की हेझलवूड, कमिन्स आणि स्टार्क यांनी ऑस्ट्रेलियासाठी दीर्घ कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, नॅथन लायनने जी भूमिका बजावली आहे, त्यावरून तो मुख्य गोलंदाज आहे असे वाटते. तो अजूनही चांगली कामगिरी करत आहे.”
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सलग दोन मालिका जिंकल्या आहेत. भारतीय फलंदाजांकडून प्रेरणा घेतल्याचे सांगत ब्रॉड म्हणाला, ”भारतीय संघाने लायनला खूप चांगले खेळले आहे. त्यामुळे भारताने मालिका जिंकली असे मला वाटते. भारतीय फलंदाज लायनला ज्या पद्धतीने खेळले आहे ते आमच्या फलंदाजांना पाहावे लागेल. ऑस्ट्रेलियात लायनविरुद्ध आम्ही दीर्घकाळ खराब कामगिरी केली आहे. ही अशी मालिका आहे जिथे संघाला हे बदलावे लागेल.”
विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध लायन कारकिर्दीत सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनरने इंग्लंडविरुद्ध २३ कसोटीत ३०.५३ च्या सरासरीने ८५ बळी घेतले आहेत. ज्यात इंग्लंडविरुद्धच्या एका डावात दोन वेळा ५ बळी घेतलेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: रचिन रवींद्रच्या फिरकीपुढे भारतीय कर्णधाराची गिरकी, असा झाला विराट क्लीन-बोल्ड
“मला सिराजमध्ये मॅकग्राची झलक दिसते”; वरिष्ठ भारतीय खेळाडूने गायले गुणगान