बांगलादेश आणि वेस्टइंडीज दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने सामन्याच्या पाचव्या दिवशी 395 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना अविश्वसनीय विजय मिळवला. कायले मेयर्स वेस्ट इंडिजच्या या अद्भुत विजयाचा नायक ठरला. आपले कसोटी पदार्पण करत असलेल्या मेयर्सने नाबाद द्विशतक झळकावत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.
मेयर्सचे संस्मरणीय द्विशतक
395 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना वेस्टइंडीजची सुरुवात फारच खराब झाली. त्यांनी आपले 3 गडी केवळ 59 धावांवर गमावले. यानंतर मात्र निकृमाह बॉनर व कीले मेयर्स या दोन पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी 216 धावांची शानदार भागीदारी केली. बॉनर 86 धावांवर बाद झाल्यानंतर वेस्ट इंडीजचा विजय फार दूर मानला जात होता, मात्र मेयर्सने एका बाजूने खिंड लढवत संघाला 3 विकेट राखत ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
मेयर्सने 310 चेंडूत 20 चौकार व 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 210 धावांची नाबाद खेळी केली. विशेष म्हणजे वेस्टइंडीजने आपल्या या पाठलागात अनेक विक्रम प्रस्थापित केले. हा आशियामधील सर्वात मोठा तर विश्व क्रिकेटमधील चौथा सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरलेला आहे.
बांग्लादेशच्या विजयाची होती अपेक्षा
सामन्यावर सुरुवातीचे चार दिवस बांगलादेशचे वर्चस्व होते. बांगलादेशने पहिल्या डावात 430 धावा केल्या होत्या. मेहदी हसनच्या शतकाचा यात मोठा वाटा होता. त्यानंतर यजमानांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 259 धावांवर रोखला. त्यामुळे बांगलादेशला पहिल्या डावात १७१ धावांची आघाडी मिळाली होती.
यांनतर बांगलादेशने आपला दुसरा डाव 8 बाद 223 धावांवर घोषित केला होता. कर्णधार मोमिनुल हकने या डावात शतक झळकावले होते. त्यामुळे चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजला 395 धावांचे जवळपास अशक्य लक्ष्य मिळाले होते. परंतु कायले मेयर्सने जबरदस्त खेळी करत पाहुण्या संघाला विजयी रेषा ओलांडून दिली.
महत्वाच्या बातम्या:
रिषभमध्ये लपलाय मोठा लेखक! चेन्नई कसोटीतील पंतची मजेदार वाक्ये वाचून तुम्हीही असंच म्हणाल
शतक आणि पंतच थोडसं वाकडचं! आजवर चक्क चार वेळा झालाय ९०-९९ धावांवर बाद