मुंबई । साउथॅम्पटन कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला संघात स्थान देण्यात आले नाही. त्याच्याऐवजी जोफ्रा आर्चर याची संघात वर्णी लागली. ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 485 बळी टिपले आहेत. तरीही त्याला संघात स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रॉडच्या जागी निवडण्यात आलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील संभ्रमित आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. इंग्लंड संघाने अंतिम अकरा जणांच्या संघात गोलंदाजीमध्ये जिमी अँडरसन, मार्क वुड, जोफ्रा आर्चर यांना संघात स्थान दिले तर फिरकीची जबाबदारी डॉमबेस याच्याकडे दिली आहे.
मागील वर्षी अॅशेस मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा आर्चर म्हणाला की, “मला अजूनही माहीत नाही की ब्रॉडच्या जागेवर मला संधी कशी मिळाली. मी संभ्रमात आहे. पण मला संधी मिळाल्याने मी खूश आहे. आशा करतो की, या कसोटीत दमदार कामगिरी करून दाखवीन.”
बुधवारी इंग्लंडच्या खेळाडूंनी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंबरोबर एक गुडघा जमिनीवर टेकवून ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ अभियानाचे समर्थन केले. दोन्ही संघाच्या टी शर्टवर ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ चा लोगो लावण्यात आला होता.
आर्चर हा सध्याच्या इंग्लंड संघात एकमेव कृष्णवर्णीय खेळाडू आहे. त्याने सहकाऱ्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. जोफ्रा आर्चर म्हणाला, “समर्थन मिळणे ही चांगली गोष्ट आहे. हे वर्ष कृष्णवर्णी समुदायासाठी नव्हे तर सर्वांचेच डोळे उघडणारे राहिले आहे.”