भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला, जो भारताने 5 विकेट्स राखून नावावर केला. त्यानंतर मालिकेतील आता दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) याच मैदानावर खेळला जाईल. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय संघाने या दौऱ्यावरील कसोटी मालिकेत 1-0 असा विजय संपादन केला होता. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिला सामना देखील आपल्या नावे केला. आता दुसरा सामना जिंकून मालिका नावे करण्याचा प्रयत्न रोहित शर्मा व संघ करेल. त्याचवेळी यजमान वेस्ट इंडीज हा सामना जिंकून आपले आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.
हा सामना महत्त्वाचा असला तरी बार्बाडोसचे वातावरण चाहत्यांचा हिरमोड करू शकते. कारण, शनिवारी बार्बाडोसमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे हा सामना कमी षटकांचा होऊ शकतो अथवा रद्द केला जाऊ शकतो. हा सामना रद्द झाल्यास 1 ऑगस्ट रोजी होणारा अखेरचा सामना निर्णायक ठरेल.
या सामन्यात भारतीय संघात संजू सॅमसन याला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात खेळवलेल्या सूर्यकुमार यादव याला अपयश आल्याने संघ व्यवस्थापन हा निर्णय घेऊ शकते. याव्यतिरिक्त जयदेव उनाडकत हा देखील उमरान मलिक याची जागा घेण्याची शक्यता आहे.
पहिल्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघ 23 षटकांत केवळ 114 धावा करत सर्वबाद झाला, तर भारताने 22.5 षटकांत 5 विकेट्सच्या नुकसानावर 118 धावा करत विजय मिळवला.
(West Indies V India 2nd Test Rain Will Be Spoiler For India In Barbados)
महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज
स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’