न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ अंतिम चरणात पोहोचला आहे. या विश्वचषकातील २८ वा सामना रविवारी (२७ मार्च) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. भारतीय संघासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ३ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. परंतु भारताचा पराभव एका संघाच्या मात्र पथ्यावर पडला आहे. भारतीय महिलांना सामना गमावल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला. तो संघ आहे, वेस्ट इंडिज.
काय आहे वेस्ट इंडिजच्या आनंदामागचे कारण
तर महिला वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाने संपूर्ण साखळी फेरीत अजेय राहात सर्वप्रथम उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यांच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारतीय संघांमध्ये चुरस होती.
To the semi-finals WI go!!!!! #CWC22 #TeamWestIndies pic.twitter.com/OHRr7vPpcT
— Windies Cricket (@windiescricket) March 27, 2022
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडने बांगलादेशवर मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या जय-पराजयावर उपांत्य फेरीतील चौथा संघ अवलंबून होता. भारताने हा सामना जिंकला असता तर त्यांनी उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले असते. परंतु त्यांनी जर हा सामना गमावला तर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत जाणारा चौथा संघ ठरणार होता.
हेही वाचा- एका नो बॉलमुळे ३ वेळा तुटलंय करोडो भारतीयांचं हृदय, आता महिला संघही विश्वचषकातून झालाय बाहेर
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ३ विकेट्सने गमावला आणि परिणामी वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचला. याचमुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. भारताने सामना गमावल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये उड्या मारत नाचताना दिसल्या होत्या. त्यांचा जल्लोष साजरा करताना व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
In everything, WI give thanks to the Almighty🙏🏼#CWC22 #TeamWestIndies #MaroonWarriors pic.twitter.com/eMjvFZYlsr
— Windies Cricket (@windiescricket) March 27, 2022
नो बॉलमुळे झाला घोळ
दरम्यान भारतीय संघाने महत्वपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बरोबरीची टक्कर दिली होती. भारताकडून सलामीवीर स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिताली राज यांनी शानदार अर्धशतके केली होती. परंतु भारतीय फलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनावर गोलंदाजांच्या खराब कामगिरीने पाणी फेरले. दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण डावादरम्यान धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी नो बॉल टाकल्याने भारतीय संघाला ३ विकेट्सने हा सामना गमवावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
एका नो बॉलमुळे ३ वेळा तुटलंय करोडो भारतीयांचं हृदय, आता महिला संघही विश्वचषकातून झालाय बाहेर
PBKS vs RCB: पंजाबचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; नव्या कर्णधारांसह असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ