भारतीय संघाला आपला पुढील कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरला खेळायचा आहे. त्यापूर्वी ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर सारखे स्टार भारतीय खेळाडू ‘बुची बाबू’ स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. पण आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की ही ‘बुची बाबू स्पर्धा’ काय आहे? चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला या स्पर्धेबद्दल माहिती देणार आहोत.
बुची बाबू स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होतात. यावर्षीची बुची बाबू स्पर्धा तामिळनाडूमध्ये होणार आहे. ही स्पर्धा तामिळनाडूमधील चार वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाईल, ज्यात तिरुनेलवेली, कोईम्बतूर, सेलम आणि नाथम यांचा समावेश आहे. गुरुवार, 15 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होत आहे.
बुची बाबू स्पर्धेनं भारताच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात होते. ही भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. मोथावरपू वेंकट महिपती नायडू हे ‘बुची बाबू’ या नावानं ओळखले जायचे. त्यांनी मद्रासमध्ये क्रिकेट लोकप्रिय करण्यात मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते.
ही स्पर्धा रणजी ट्रॉफीमध्ये वापरल्या जाणाऱ्या चार दिवसांच्या फॉरमॅटनुसार खेळली जाईल. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 3 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 2 लाख रुपयांचं बक्षीस मिळेल. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार असून यामध्ये मध्य प्रदेश, झारखंड, रेल्वे, गुजरात, मुंबई, हरियाणा, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, हैदराबाद, बडोदा आणि दोन स्थानिक संघांचा समावेश आहे. हे दोन स्थानिक संघ TNCA इलेव्हन आणि TNCA अध्यक्ष इलेव्हन असतील. 12 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.
स्पर्धेचे चार गट
अ गट – मध्य प्रदेश, झारखंड, हैदराबाद
ब गट – रेल्वे, गुजरात, TNCA अध्यक्ष इलेव्हन
क गट – मुंबई, हरियाणा, TNCA इलेव्हन
ड गट – जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, बडोदा
हेही वाचा –
37 वर्षीय रोहित शर्माची वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, या क्रिकेटपटूंचे मात्र नुकसान
काैतुकास्पद…!! श्रीजेशसोबत त्याची 16 क्रमांकाची जर्सीही निवृत्त, हॉकी इंडियाची मोठी घोषणा
ठरलं! आयपीएल विजेता केकेआर स्टार्कसह या 5 खेळाडूंना रिटेन करणार