आजच्याच दिवशी(24 सप्टेंबर) 13 वर्षांपूर्वी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला वहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करत टी20 चे विश्वविजेतेपद मिळवले होते.
या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती, तर भारताला 1 विकेटची. त्यावेळी भारताचा कर्णधार एमएस धोनीने जोगिंदर शर्माकडे शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला.
या षटकात जोगिंदरने पहिल्याच दोन चेंडूत 7 धावा दिल्या. त्यामुळे पाकिस्तानला जिंकण्यासाठी 4 चेंडूत 6 धावा असे समीकरण झाले होते आणि पाकिस्तानकडून फलंदाजी करत होता मिस्बाह उल हक.
यावेळी जोगिंदरने तिसरा चेंडू लेंथमध्ये बदल करत आणि कमी गतीने टाकला आणि 43 धावांवर खेळणाऱ्या मिस्बाहने त्यावर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण फाइन लेगला उभ्या असणाऱ्या एस श्रीसंथने त्याचा झेल घेतला.
या विकेटसह भारताने विश्वचषकही जिंकला. या षटकानंतर जोगिंदर करोडो भारतीयांसाठी हिरो ठरला.
This day, in 2⃣0⃣0⃣7⃣#TeamIndia were crowned World T20 Champions 😎🇮🇳 pic.twitter.com/o7gUrTF8XN
— BCCI (@BCCI) September 24, 2019
पण जोगिंदरसाठी मात्र हा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याने भारताकडून सामना खेळला नाही. या विश्वचषकानंतर तो हरियाणामध्ये पोलिस खात्यात भर्ती झाला. सध्या तो हरियाणामध्ये पोलिस उपअधीक्षक(डीएसपी) आहे.
असे असले तरी तो मागीलवर्षीपर्यंत क्रिकेट खेळत होता. तसेच त्याने 2007 टी20 विश्वचषकानंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून काही सामने खेळले. तसेच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळला.
त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भारताकडून 4 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले. यामध्ये अनुक्रमे त्याने 1 आणि 4 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 77 सामन्यात 5 शतके आणि 10 अर्धशतकांसह 2804 धावा केल्या आणि 297 विकेट्सही घेतल्या आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 80 सामन्यात 1040 धावा आणि 115 विकेट्स घेतल्या.
12Anniversary for T20 champion team 12 years kaise gae pta hi nahi lga thnks for all for your lot of love and spot @vikrantgupta73 @harbhajan_singh @BCCI @YUVSTRONG12 @ZeeNewsHindi @aajtak pic.twitter.com/T3UzfgCjUI
— Joginder Sharma 🇮🇳 (@MJoginderSharma) September 24, 2019
मागीलवर्षी जोगिंदरने 2007 टी20 विश्वचषक विजयाला 12 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विट केले होते की ’12 वर्षे कशी गेली कळालेच नाही. तूम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद’