भारतीय उपखंड म्हणजे क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्यांचे माहेरघर. क्रिकेटला सुरुवात जरी इंग्लंडमध्ये झाली असली तरी, क्रिकेट वाढलं आणि जोपासले गेले ते भारतीय उपखंडात. याचाच परिपाक म्हणून भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका वर्ल्ड चॅम्पियन बनले. बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही सध्या बरीच प्रगती केलीये. याच भारतीय उपखंडात आजवर तीन वर्ल्डकप खेळले गेले. भारत आणि पाकिस्तानत 1987 चा झाल्यानंतर पुन्हा नऊ वर्षांनी उपखंडात वर्ल्डकप आलेला. यावेळी यजमान म्हणून आणखी एका देशाची भर पडलेली. तो देश होता श्रीलंका. मात्र या वर्ल्डकपच्या एक दिवस आधी खेळली गेलेली अशीच एक मॅच अजरामर झालेली. आज त्याच मॅचची ही कहाणी.
भारतीय उपखंडात वर्ल्डकप पुन्हा होणार यामुळे सर्वजण आनंदी होते. 14 फेब्रुवारी 1996 ला वर्ल्डकपचा श्रीगणेशा होणार होता. मात्र, नेमके त्याच्या काही दिवस आधीच श्रीलंकेतील वातावरण कमालीचे भडकले. जानेवारी महिन्यातच तमिळ विरुद्ध श्रीलंकन असा संघर्ष पेटला. त्यामुळे वर्ल्डकपसाठी श्रीलंकेत येणाऱ्या संघांमध्ये भीती पसरली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने तर श्रीलंकेत खेळण्यास स्पष्ट नकार दिला. श्रीलंकन सरकारने हवी तितकी सुरक्षा देण्याचा शब्द दिला. आयसीसीने देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर तोडगा निघतच नव्हता. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू न खेळण्यावर अडून बसले. अशावेळी काय करावे हे सुचेना. आपल्या सहयजमानावर वाईट वेळ आली आहे हे पाहून बीसीसीआय आणि पीसीबी पुढे आली. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला सॉलिडॅरिटी कप खेळण्याचा.
इतर देशांची भीती कमी करण्यासाठी भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांसह खेळाडूंनी वर्ल्डकपच्या एक दिवस आधी कोलंबोत मॅच खेळण्याचे कबूल केले. 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मॅचची खासियत अशी होती की, या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघाकडून खेळणार होते. त्या संघाला नाव दिले गेले विल्स इलेव्हन. त्यांच्या विरुद्ध होती श्रीलंकेची संपूर्ण टीम.
विल्स इलेव्हनमध्ये दोन्ही देशातील मान्यवर खेळाडू सामील केले गेले. भारताकडून सचिन तेंडुलकर, कॅप्टन अझर, अजय जडेजा, अनिल कुंबळे, तर पाकिस्तानकडून वसीम-वकार, सोहेल-अन्वर हे सामील झालेले. या मॅचसाठी कोलंबोच्या त्या प्रेमदासा स्टेडियमवर अफाट गर्दी झाली. मॅच प्रत्येकी 40 ओव्हरची होणार होती. श्रीलंकन कॅप्टन अर्जुन रणतुंगाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला खरा. मात्र, त्यांचा हा निर्णय तितका फलदायी ठरला नाही. त्यांना अनिल कुंबळेने डोकेच वर काढू दिले नाही. कुंबळेच्या अवघ्या 12 रन्समधील चार विकेट्सच्या जोरावर विल्स इलेव्हनने श्रीलंकेचा डाव 168 रन्सवर संपविला.
त्या इनिंगमधील खासियत होती रोमेश कालूवितरणाची विकेट. क्रिकेट इतिहासातील दोन सर्वात कट्टर प्रतिद्वंदी असलेल्या सचिन तेंडुलकर आणि वसीम अक्रम यांच्यामुळे ती विकेट खास बनली. अक्रमच्या बॉलिंगवर सचिनने तो कॅच पकडलेला. असा क्षण यापूर्वी कधी आला नव्हता आणि यानंतरही आला नाही.
विल्स इलेव्हनसाठी ओपनिंग करण्याकरता पुन्हा एकदा दोन दिग्गज उतरले. एक होता सचिन तेंडुलकर आणि दुसरा सईद अन्वर. त्यांनीदेखील 53 रन्सची ओपनिंग देत सर्वांचे मनोरंजन केले. अन्वर आणि त्यानंतर आलेला अमीर सोहेल आऊट झाले. मात्र, सचिनने एक बाजू लावून धरली. सचिनच्या 36 आणि कॅप्टन अझरच्या 32 रन्सच्या जोरावर विल्स इलेव्हनने चार विकेटने सहज मॅच खिशात घातली. अनिल कुंबळे त्या ऐतिहासिक मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला.
भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंनी या सॉलिडिटरी कपच्या निमित्ताने एकत्रित मॅच खेळली, तरी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या संघावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ते श्रीलंकेत न खेळण्याच्या आपल्या निर्णयावर कायम राहिले. परिणामी आयसीसीला त्या दोन्ही मॅचेस श्रीलंकेला बहाल कराव्या लागला. त्यामुळे श्रीलंकेचे क्वार्टर फायनलमधील स्थान एकही मॅच न खेळताच निश्चित झाले. पुढे जाऊन श्रीलंकेनेच तो वर्ल्डकप आपल्या नावे केला. तोही मग्रूर ऑस्ट्रेलियालाच हरवून. वर्ल्डकप कमालीचा यशस्वी झाला. भारत-श्रीलंकेच्या सेमी फायनलला थोडं गालबोटही लागलं. परंतु, भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंना एकाच संघात पाहण्याची जी पर्वणी वर्ल्डकपच्या सुरुवातीला सर्वांना लाभली ती केवळ अवर्णनीय!!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
पत्रकाराच्या ‘त्या’ आर्टिकलमुळे सिद्धूंंवर झालेली टीका, पण वर्ल्डकपमध्ये वादळ आणत केली होती बोलती बंद