प्रत्येक फलंदाजाचे स्वप्नं असते की, त्याने देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करावे, तर गोलंदाजाचे देखील स्वप्नं असते की, त्याने कसोटी क्रिकेटच्या एका डावात जास्तीतजास्त गडी बाद करण्याचा पराक्रम करावा. परंतु, काही मोजकेच गोलंदाज आहेत, ज्यांना एका डावात १० गडी बाद करण्याचा कारनामा करण्यात यश आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे एजाज पटेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतरचा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. पण अनेकांना हे माहित नाही की, एजाजच्यापूर्वी मुथय्या मुरलीधरन हा कारनामा करणारा तिसरा गोलंदाज ठरला असता. त्याच्याकडे देखील हा मोठा पराक्रम करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, त्याच्याच संघ सहकाऱ्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याचा विक्रम थोडक्यात राहून गेला होता.
थोडक्यात हुकला मुथय्या मुरलीधरनचा विक्रम
मुथय्या मुरलीधरन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ८०० गडी बाद करणाऱ्या या गोलंदाजाने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
तसेच २००२ मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी होती. तो कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० गडी बाद करण्यापासून केवळ एक पाऊल दूर होता. त्यावेळी त्याचाच संघ सहकारी चमिंडा वासने शेवटच्या फलंदाजाला बाद केले होते आणि हा मोठा विक्रम राहून गेला होता.
तर झाले असे की, २००२ साली कँडीच्या मैदानावर श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा कसोटी सामना पार पडला होता. त्यावेळी मुथय्या मुरलीधरन याच्या फिरकी गोलंदाजी समोर झिम्बाब्वे संघातील फलंदाज अडचणीत सापडले होते. त्यानी अवघ्या ५१ धावा खर्च करत झिम्बाब्वेच्या ९ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. शेवटच्या फलंदाजाला बाद करताच त्याचे नाव इतिहासात कोरले जाणार होते. परंतु, पुढील षटक टाकण्यासाठी चामिंडा वास गोलंदाजीला आला आणि त्याने झिम्बाब्वेचा १० वा फलंदाज बाद केला.
त्यामुळे मुथय्या मुरलीधरनला ९ गडी बाद करून समाधान मानावे लागले. नाहीतर तो असा कारनामा करणारा तिसरा गोलंदाज ठरला असता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना झाला. या सामन्यातील पहिल्या डावात एजाज पटेलने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात एजाज पटेलने भारतीय संघातील एकूण एक फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, मोठी अपडेट आली समोर






