सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा हा एक यशस्वी सलामीवीर म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्वात ज्ञात आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात मध्य फळीतील फलंदाज म्हणून केल्यानंतर २०१३ पासून तो नियमित सलामीवीर बनला. तेव्हापासून त्याचे आणि भारतीय क्रिकेटचे एक प्रकारे भाग्य बदलले. मात्र, रोहित शर्मा सलामीवीर होण्यात सध्या भारतीय संघाचा प्रमुख फिनिशर बनलेला अनुभवी दिनेश कार्तिक कारणीभूत होता.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत नऊ वर्षांपूर्वीचा हा किस्सा सांगताना ते म्हणाले,
“२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीने निर्णय घेतला होता की रोहित डावाची सुरुवात करेल. या महत्त्वाच्या स्पर्धेत प्रथमच रोहित सलामीवीराची भूमिका पार पाडत होता. सराव सामन्यांत दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करत होता. त्याला वगळता येणे जवळपास वादाला निमंत्रण देण्यासारखे झाले असते. त्याचवेळी रोहित शर्मादेखील तत्कालीन कर्णधार एमएस धोनीला संघात हवा होता. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने विशेषतः धोनीने रोहितला सलामीवीराची जागा दिली. तो एक अद्भुत निर्णय होता.”
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ च्या आधीच्या सराव सामन्यात दिनेश कार्तिकने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध १४६ धावा केल्या होत्या. त्यामुळे धोनीला कार्तिकला निव्वळ फलंदाज म्हणून संघात कायम ठेवायचे होते. कार्तिकला मधल्या फळीत ठेवण्यासाठी धोनीने रोहितकडून डावाची सुरुवात करून घेतली होती. हा डाव भारतासाठी भलताच फायद्याचा ठरला होता. रोहितनेही धोनीचा विश्वास खरा ठरवला. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनसोबत सलामी दिली आणि भारतीय संघाने त्याच वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले. तेव्हापासून रोहित भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी सलामीवीर बनला आहे. सलामीवीर म्हणून अनेक मोठे विश्वविक्रम त्याच्या नावे जमा झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी लकी! पठ्ठ्याने जेवढे सामने खेळले, तेवढेही सामने संघाने जिंकले
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार
CWG 2022 | भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरूच, वेटलिफ्टिंगमध्ये गुरदीपने जिंकले दहावे पदक