भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा नेहमीच त्याच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखला जातो. अनेकदा त्याच्या आक्रमकपणामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात येते, तर कधीकधी तो एखाद्या वादातही अडकताना दिसतो. पण अशाच एका वादात अडकण्यापासून वाचण्यासाठी विराटने चक्क सामनाधिकाऱ्यांना विनंती केली होती.
भारतीय संघ २०११-१२ सालादरम्यान एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. विराटचा हा कसोटी संघासह पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. त्यावेळी विराट आपले स्थान भारतीय कसोटी संघात पक्के करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला तत्कालीन कर्णधार धोनीचा पाठिंबाही मिळत होता. पण असे असले तरी या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील विराटचे स्थान त्याच्याच एका वर्तनामुळे धोक्यात आले होते.
झाले असे की या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघ भारतावर वरचढ ठरत होता. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंसह चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. त्यावेळी सिडनी येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान विराटने बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांना मधले बोट दाखवले होते.
त्यावेळी त्याच्या या वर्तनाची प्रचंड चर्चा झाली होती. तसेच त्याच्यावर टीकाही झाली होती. तसेच त्याच्यावर बंदी येण्याचीही शक्यता होता. मात्र, विराटने अशी शिक्षा न करण्याची विनंती सामनाधिकारी रंजन मदुगल यांच्याकडे केली होती.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार विराटने त्या घटनेबद्दल सांगितले की “सामनाधिकाऱ्यांनी मला त्यांच्या रुममध्ये दुसऱ्या दिवशी बोलावून घेतले होते आणि मी त्यांना विचारले की ‘काय झालं?’ तेव्हा त्यांनी विचारलं की ‘काल बाऊंड्री लाईनजवळ काय झालं?’ त्यावर मी म्हणालो की ‘काही नाही, केवळ मस्ती सुरु होती.’ त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर वर्तमानपत्र फेकले आणि त्यावर माझा पहिल्याच पानावर मोठा फोटो होता. त्यानंतर मी म्हणालो, ‘मला माफ करा, पण कृपया माझ्यावर बंदी घालू नका.’ ते खूप चांगले व्यक्ती होती. त्यांनी मला समजून घेतले की मी तेव्हा युवा होते आणि अशा गोष्टी होतात.”
विराटवर त्यानंतर बंदी घालण्यात आली नाही. तो तिसऱ्या कसोटीत खेळला. विशेष म्हणजे या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४४ आणि दुसऱ्या डावात ७५ धावांची खेळी केली. तसेच चौथ्या सामन्यात त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर मात्र, विराटने कधीही मागे वळून पाहिले नाही. पुढे जाऊन विराट भारतीय संघातील प्रमुख फलंदाज तर बनलाच, पण भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सिंधूने रचला इतिहास! टोकियोत ‘कांस्य’ जिंकत दोन ऑलिंपिक पदकं मिळणारी बनली भारताची दुसरीच खेळाडू
ऍलिस्टर कुकने निवडला ‘सर्वकालीन संघ’, पण एकाही भारतीय खेळाडूवर दाखवला नाही विश्वास