मोहाली। किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात पार पडलेल्या सामन्यात पंजाबने दिल्लीवर ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात केएल राहुलने केलेली अर्धशतकी खेळी महत्वपूर्ण ठरली. तसेच त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.
राहुलने १४ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण करताना भारताकडून ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक केले. तसेच त्याने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक केले. त्याने ०, २, ०, ६, ४, ४, ६, ४, १, ४, ६, ६, ४, ४, ४ अशा धावा करत अर्धशतक पूर्ण केले.
याचबरोबर राहुल ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या तीन षटकातच अर्धशतक पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज बनला आहे.
जेव्हा मयांक अग्रवाल बाद झाला तेव्हा मैदानावर आलेल्या युवराजने केएल राहुलजवळ एक चिंता व्यक्त केली. याबद्दल केएल राहुलनेच खुलासा केला आहे.
“युवराज मैदानावर येताच मला म्हणाला, ‘मला भीती होती की तू माझ्या १२ चेंडूत केलेल्या अर्धशतकाचा विक्रम मोडतोय की काय'”, असे राहूल म्हणाला.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजून युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक केले होते.
राहुलने १६ चेंडूत ५१ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले. त्याचा झंझावात ट्रेंट बोल्टने संपवला. राहुलच्या या वेगवान खेळीमुळे पंजाबने पहिल्या ३ षटकातच ५० धावा धावफलकावर लावल्या होत्या.
राहुलने आजपर्यंत ४० आयपीएल सामन्यात खेळताना ३१.४ च्या सरासरीने ७७६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तो याआधीच्या आयपीएल मोसमांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला. पण यावर्षी त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने ११ कोटी देऊन संघात घेतले आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज:
केएल राहुल: १४ चेंडूत अर्धशतक (दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध, मोहाली, २०१८)
युसूफ पठाण: १५ चेंडूत अर्धशतक (सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध, कोलकाता, २०१४)
सुनील नारायण: १५ चेंडूत अर्धशतक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध, बंगलोर, २०१७)
सुरेश रैना: १६ चेंडूत अर्धशतक (किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध, मुंबई, २०१४)