---Advertisement---

साई सुदर्शनऐवजी संघात संधी मिळणारे शेख रशीद कोण? जाणून घ्या…

On: शनिवार, ऑगस्ट 8, 2026 6:16 PM
---Advertisement---

साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी शेख रशीद यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. रशीद हे फलंदाज असून ते गोलंदाजीही करू शकतात. त्यांनी गेल्या महिन्यात गॉल येथे इंडिया ‘ए’ कडून श्रीलंका ‘ए’ विरुद्ध 2 सामने खेळले होते, ज्यातील एका डावात त्यांनी अर्धशतकही ठोकले होते. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गॉल येथेच होणार असून, रशीद येथील परिस्थिती चांगल्या प्रकारे ओळखतात. चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोणत्या संघाकडून खेळतात आणि त्यांची आकडेवारी कशी आहे.

​शेख रशीद यांचा जन्म 24 सप्टेंबर 2004 रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झाला. 2022 मध्ये अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते उपकर्णधार होते. 2021 मध्ये ते अंडर-19 आशिया चषकातही खेळले होते, ज्याच्या उपांत्य फेरीत त्यांनी नाबाद 90 धावांची खेळी केली होती.

​रशीद यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व्हिसेसविरुद्ध आंध्र प्रदेशकडून खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण (Debute) केले. मात्र, पहिल्या सामन्यात त्यांना केवळ 23धावाच करता आल्या. त्याच वर्षी त्यांनी लिस्ट ‘ए’ आणि टी-20 क्रिकेटमध्येही पदार्पण केले.

​उजव्या हाताने फलंदाजी करणारे रशीद फिरकी गोलंदाजीही करतात. त्यांनी 29 प्रथम श्रेणी (First Class) सामन्यांच्या 47 डावांमध्ये 1959 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सरासरी 46.64 असून, 202 धावा ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

​लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये त्यांनी 15 सामने खेळले असून त्यात 219 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये रशीद यांनी 28 डावांत 533 धावा केल्या असून, या फॉरमॅटमध्ये त्यांनी एक शतकही झळकावले आहे. याशिवाय टी20 मध्ये त्यांनी 2 अर्धशतके केली आहेत.

​शेख रशीद यांना चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2023 मध्ये संघात घेतले होते. त्यांनी गेल्या वर्षी सीएसकेसाठी पदार्पण केले. त्या हंगामात त्यांनी 5 सामने खेळले, पण त्यात त्यांना विशेष काही कमाल करता आली नाही; त्यांनी एकूण 71 धावा केल्या.

​शेख रशीद यांनी यावर्षी आंध्र प्रदेशकडून ३ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये विदर्भाविरुद्ध त्यांनी 132 धावांची नाबाद खेळी केली होती. गेल्या महिन्यात त्यांनी इंडिया ‘ए’ कडून श्रीलंका ‘ए’ विरुद्ध 4 डावांत 128 धावा केल्या; त्यांनी गोलंदाजीही केली, मात्र त्यांना एकही विकेट मिळाली नाही. हे दोन्ही सामने गॉल येथे झाले होते, जिथे 15 ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---