भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या याला मंगळवारी (२७ जुलै) कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मंगळवारी (२७ जुलै) होणारा दुसरा टी२० सामना स्थगित करण्यात आला होता. हा सामना आता आज (२८ जुलै) खेळला जाणार आहे. कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याला ७ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याची पुन्हा एकदा आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. कृणाल पंड्या संघाबाहेर झाल्यामुळे भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होईल हे तर निश्चित आहे.
कृणाल पंड्या एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी एका अष्टपैलू खेळाडूलाच स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी कृष्णप्पा गौतम हा प्रबळ दावेदार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा कृष्णप्पा गौतम हा गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही मोलाचे योगदान देऊ शकतो.
त्याला श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. परंतु, त्याला या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याने फलंदाजी करताना अवघ्या २ धावा केल्या होत्या. यासह ६ पेक्षाही अधिकच्या इकोनॉमीने धावा खर्च करत त्याने १ गडी बाद केला होता. परंतु, टी -२० स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णप्पा गौतमला दुसऱ्या टी -२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.(Who will replace krunal Pandya in 2nd T20I find out India,s probabal playing 11)
राहुल चाहर – कुलदीप यादवला दिली जाऊ शकते संधी
कृणाल पंड्या ऐवजी भारतीय संघात गौतमऐवजी एका फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात येऊ शकते. पहिल्या टी-२० सामन्यात फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवर मदत मिळत होती. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात शिखर धवन आणि संघ व्यवस्थापक कुलदीप यादव किंवा राहुल चाहर यापैकी एका गोलंदाजाला संधी देऊ शकतात. कृणाल पंड्या संघाबाहेर झाल्यामुळे भारतीय संघातील एक फलंदाज कमी झाला आहे. तसेच हार्दिक पंड्या देखील साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
असा असू शकतो भारताचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गौतम, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि वरूण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच ना! भूतानची कर्मा दीपिका कुमारीकडून पराभूत; थोड्याच वेळात होणार पुढील सामना