नवी दिल्ली: क्रिकेटचा खरा ‘सिक्सर किंग’ वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल (Chris Gayle) याला म्हटले जाते. तो जर त्याच्या लयीमध्ये असेल तर गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्याने बऱ्याचदा गोलंदाजांची पिसे काढली आहेत. 6 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये त्याने झंझावाती खेळी केली होती. त्याने एकाच टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. हा सामना बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) मधल्या रंगपूर रायडर्स (Rangpur Riders) आणि ढाका डायनामाईट्स (Dhaka Dynamites) या दोन संघात खेळवण्यात आलेला.
या सामन्यात ख्रिस गेल रंगपूर रायडर्स संघाकडून खेळत होता. त्याने 18 षटकार ठोकत 69 चेंडूत नाबाद 146 धावा केल्या होत्या. 18 षटकारांसोबत 5 चौकार देखील होते. 146 पैकी 128 धावा षटकार आणि चौकारांमधून आलेल्या. गेलच्या या खेळीमुळे रंगपूर रायडर्सने 20 षटकात 1 विकेट गमावून 206 धावा केल्या. ढाका डायनामाईट्स लक्ष्याचा पाठलाग करताना 149 धावांमध्येच गुंडाळला आणि गेलचा संघ हा सामना 57धावांनी जिंकला.
गेलने मोडला 2013 चा स्वतःचाच विक्रम
गेलने 18 षटकार मारून एका डावांत सर्वाधिक षटकार मारण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला होता. त्याने तो विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) खेळताना पुणे वॉरिअर्स इंडियाविरुद्ध (Pune Warriors India) खेळताना केला होता. तेव्हा त्याने 17 षटकार ठोकत 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या होत्या. ही अजूनही टी20 मधली एका डावात केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. त्याने तेव्हा 17 षटकारांसोबत 13 चौकार सुद्धा मारले होते.
पुनीत बिष्टने ठोकले टी20 सामन्यात 17 षटकार
एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत गेलनंतर भारतीय खेळाडू पुनीत बिष्ट (Punit Bisht) आहे. बिष्टने यावर्षी मेघालयकडून खेळताना मिझोराम विरुद्ध 17 षटकार ठोकले होते. त्याने 51 चेंडूत 146 धावा केल्या होत्या. त्यात 6 चौकार देखील समाविष्ट होते. या यादीत पुनीतनंतर इंग्लंडचा ग्रॅहम नेपियर (Graham Napier), श्रीलंकाचा दसून शनाका (Dasun Shanaka), अफगाणिस्तानचा हजरतुल्लाह जजाई (Hazratullah Zazai) हे आहेत. या तिघांनी एका डावांत 16-16 षटकार ठोकलेेेले. गेलने टी20 सामन्यात 15 षटकार सुद्धा ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! महत्त्वाच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या प्रमुख ३ खेळाडूंना कोरोनाची लागण
धक्कादायक! क्रिकेट क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव, बांगलादेशच्या २ क्रिकेटर आढळल्या पॉझिटिव्ह
एक फ्लॉप कामगिरी अन् कारकिर्दीला फुलस्टॉप, दक्षिण आफ्रिका दौरा ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकतो शेवटचा