टोकियोमध्ये सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतासाठी रविवारचा दिवस खूप खास ठरला. एकिकडे भारताच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल चार दशकांनंतर उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चीनच्या हे बिंग जिआओला पराभूत करत कांस्यपदकाला गवसणी घातली. भारताचे टोकियो ऑलिंपिकमधील हे दुसरे पदक ठरले. तर सिंधूचे कारकिर्दीतील दुसरे ऑलिंपिक पदक ठरले. त्यामुळे तिने भारताच्या ऑलिंपिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी तिचे नाव कोरले आहे.
सिंधूने २०१६ साली रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक मिळवले होते. त्यामुळे सिंधू ऑलिंपिकमध्ये २ वैयक्तिक पदकं मिळवणारी दुसरीच भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार याने असा कारनामा केला होता. तसेच सिंधू ऑलिंपिकमध्ये २ वैयक्तिक पदकं मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
सिंधूच्या या यशाबद्दल सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच सध्या असाही प्रश्न विचारला जात आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिच्याबरोबर आईस्क्रीम खाणार का?
नक्की काय आहे हे प्रकरण?
खरंतर मोदी यांनी टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय खेळाडू रवाना होण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी पीव्ही सिंधूशी चर्चा करताना त्यांनी म्हटले होते की जर तिने टोकियो ऑलिंपिकमध्ये यश मिळवले तर ते तिला भेटल्यावर तिच्यासह आईस्क्रीम खातील. याच गोष्टीमुळे सध्या मोदी पीव्ही सिंधूबरोबर आईस्क्रीम खाणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
खरंतर पीव्ही सिंधू आणि आईस्क्रीम याबाबत एक रंजक किस्सा आहे, जो २०१६ साली घडला होता.
नक्की काय आहे आईस्क्रीमचा किस्सा
खरंतर रिओ ऑलिंपिक २०१६ स्पर्धेच्या काही महिन्यांपूर्वी पीव्ही सिंधूचे तात्कालीन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी तिला आईस्क्रीम खाण्यास बंदी घातली होती. हे सिंधूच्या फिटनेससाठी केले होते. यासह त्यांनी सिंधूचा फोन देखील काढून घेतला होता. रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकून जेव्हा सिंधू परत आली तेव्हा गोपीचंद म्हणाले होते की सिंधू आता आईस्क्रीम खाऊ शकते.
याच गोष्टीची मोदींनी सिंधूला टोकियो ऑलिंपिकपूर्वी आठवण करुन दिली होती आणि तिला यश मिळाल्यास तिच्याबरोबर आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सिंपल बट स्वीट!! विराट अन् अनुष्काच्या ‘त्या’ सिंपल लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष
‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक