भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात शानदार केली आहे. उभय संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२२ जुलै) त्रिनिदादमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने ३ धावांनी हा सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि अनुभवी शिखर धवनने चांगली सुरुवात दिल्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला. दरम्यान, शुबमन गिलने एक जबरदस्त खेळी करून भविष्यात आपणही भारतीय संघाचे सलामीचे दावेदार असल्याचे स्पष्ट केले.
न्यूझीलंडमध्ये २०१८ साली झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात शानदार कामगिरी करून शुबमन सर्वांच्या नजरेत आला होता. त्यानंतर त्याने भारतीय संघातही प्रवेश केला. तो नेहमी कसोटी संघाच्या आत बाहेर होत असतो. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला तितकीशी संधी मिळाली नाही. जानेवारी २०१९ मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन व २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक असे फक्त तीन वनडे सामने खेळले होते. त्यानंतर त्याला आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर संधी मिळाली.
त्याने या संधीचे सोने करताना एक अफलातून खेळी साकारली. कर्णधार शिखर धवनसोबत सलामीला उतरत त्याने ११९ धावांची सलामी दिली. स्वतः गिलने ५३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने 64 धावांची शानदार खेळी केली. मात्र, तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला.
सध्याच्या भारतीय फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जातात. मात्र, गेल्या काही काळापासून या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही.रोहित ३५ वर्षांचा झाला आहे, तर कोहली यंदा ३४ वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी टॉप ऑर्डरमध्ये तंत्र आणि आक्रमण यांचा संगम असणाऱ्या खेळाडूची गरज भारतीय संघाला नक्की असेल. शुबमन गिलने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवल्यास तो त्या जागेवर आपला हक्क सांगू शकतो. या मालिकेतील पुढील दोन सामन्यात तो कशी कामगिरी करतोय यावर त्याचे बरेचसे भवितव्य अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल
ही कसली व्यथा! कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघ सज्ज, पण व्हिसा वाढवतंय टेन्शन
WIvIND: काट्याच्या लढतीत टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; वेस्ट इंडिज अवघ्या ३ धावांनी पराभूत