ऑलिंपिक, आशियाई तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राजस्थानच्या 30 रहिवाशी खेळाडूंना राजस्थान सरकार नोकरी देणार आहे. यात ए ग्रेडमध्ये 11 खेळाडूंना आणि बी ग्रेडमध्ये 19 खेळाडूंनी नोकरी दिली जाईल. पण या ए आणि बी ग्रेडच्या यादी पाहिल्या तर आश्चर्य वाटण्यासारखी खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे.
या यादीत सुमित्रा शर्मा असे एका महिला कबड्डीपटूचे नाव आहे. तिने 2014 एशियन गेम्समध्ये भारताकडून सुवर्णपदक जिंकले आहे. पण राजस्थान सरकारने तिला नोकरी देताना ही गोष्ट लक्षात घेतलेली नाही. तिने 2016 ला साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. केवळ 2016 च्या या कामगिरीच्या जोरावर तिला बी ग्रेडमधील नोकरी देऊ केली आहे.
विशेष म्हणजे 2018 च्या एशियन गेम्समध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या शालिनी पाठक आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या राजूलाल चौधरी यांना मात्र ए ग्रेडमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ते लवकरच डिएसपी बनतील. मात्र एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुमित्राला बी ग्रेडमधील नोकरी मिळेल.
नक्की खेळाडूंना नोकरी देण्याची काय आहे राजस्थानची पॉलिसी?
राजस्थान सरकारची ऑउट ऑफ टर्न सर्विसची जी पॉलिसी आहे त्यात केवळ त्या खेळाडूंना नोकरी मिळणार आहे, ज्यांनी 1 जानेवारी 2016 नंतर ऑलिंपिक, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, विश्वचॅम्पियनशीप, साऊथ एशियन गेम्स, नॅशनल गेम्स आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत. त्यामुळे 2014 ची सुमित्राची कामगिरी लक्षात घेण्यात आलेली नाही.
..तर मलाही मिळाली असती ए ग्रेडची नोकरी – सुमित्रा
सुमित्राने म्हटले आहे की सरकारने चांगली पॉलिसी बनवली आहे. राजस्थानच्या अनेक खेळाडूंना थेट नोकरी मिळेल. पण जर यात 1 जानेवारी 2016 च्या ऐवजी ज्या विभागाच्या खेळाडूसाठी जो वयाचा निकष होता, तोच ठेवला असता तर फायदा झाला असता. मलाही ए ग्रेडची नोकरी मिळाली असती.
कोण आहे सुमित्रा?
सुमित्राचा कबड्डीमधील प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. तिला सुरुवातीला तिच्या कुटुंबाकडून कबड्डीसाठी प्रोत्साहन मिळाले नव्हते. ती शाळेच्या बॅगमध्ये कबड्डी किट लपवून घेऊन जात असे. पण एकदा वृत्तपत्रात नाव आल्यानंतर घरच्यांसमोर ती कबड्डी खेळत असल्याचे उघड झाले. त्यावेळीही घरच्यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला नव्हता. पण हळुहळू जेव्हा तिची कबड्डी कारकिर्द आकार घेऊ लागली तसा घरच्यांचा विरोध कमी झाला. तिने नंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले. ती मुळची जयपूरची असून तिने राजस्थान विद्यापीठातून तिचे शिक्षणही पूर्ण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कबड्डीच्या पहिलावहिल्या अर्जून पुरस्कार विजेत्याने असा केला होता आनंद साजरा
मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!
त्याने कुस्ती सोडली नसती तर आज भारत एका प्रतिभाशाली कबड्डीपटूला मुकला असता!